Delhi Capitals VS Royal Challengers Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 मध्ये पहिल्यांदाच पॉइंट्स टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील बंगळुरूने रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव केला. यासह, बंगळुरूने हंगामातील आपला सातवा विजय नोंदवला. कृणाल पांड्याच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बंगळुरूने संस्मरणीय विजय मिळवला.  

दिल्लीची खराब सुरुवात, कृणाल पांड्याने घेतला फायदा 

या सामन्यात दिल्लीची खराब सुरुवात झाली. कारण संघाने 33 धावांवर पहिली विकेट गमावली. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला अभिषेक पोरेल 11 चेंडूत 28 धावा करून आऊट झाला. यानंतर, करुण नायर 4 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला आणि चाहत्यांच्या आशा धुळीस मिळाल्या. फाफ डु प्लेसिस आणि केएल राहुल यांनी जबाबदारी सांभाळली आणि संघाचा धावसंख्या 50 च्या पुढे नेला. डु प्लेसिस सेट झाला होता, पण त्याच्या बॅटमधून वेगाने धावा येत नव्हत्या. तो दबावाखाली दिसत होता, ज्याचा फायदा कृणाल पांड्याने घेतला आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.  

पण राहुलने एका टोकाला धरून धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करत राहिला आणि तो आरसीबीसाठी धोका बनत होता, परंतु 17 व्या षटकात भुवनेश्वर कुमारने त्याची विकेट घेत आरसीबीला मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला. राहुल 39 चेंडूत 3 चौकारांसह 41 धावा काढून आऊट झाला. अक्षर पटेल (15) आणि इम्पॅक्ट प्लेयर आशुतोष शर्मा (2) आऊट झाले. शेवटी स्टब्सच्या 18 चेंडूत 34 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर, डीसीने संपूर्ण षटक खेळल्यानंतर 8 गडी गमावून 162 धावा केल्या. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.  

163 धावांच्या लक्ष्याला पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खुपच भयंकर झाली. तिसऱ्याच षटकात अक्षर पटेलने बेथेलची विकेट घेतली. बेथेलच्या बॅटमधून फक्त 12 धावा आल्या. यानंतर, त्याच षटकात, देवदत्त पडिक्कल देखील खाते न उघडता अक्षर पटेलचा शिकार झाला. दरम्यान, चौथ्या षटकात रजत पाटीदारही धावबाद झाला. याचा अर्थ आरसीबीला दोन षटकांत तीन धक्के बसले.

कृणाल पांड्या आणि विराट कोहली नावाचे वादळ 

पण यानंतर कृणाल पंड्या आणि विराट कोहली यांने संघाची सुत्र हातात घेतली. दोघांमध्ये 83 चेंडूत 113 धावांची मोठी भागीदारी झाली, ज्यामुळे आरसीबीच्या आशा जिवंत राहिल्या. पण, अर्धशतक ठोकल्यानंतर, कोहलीने 18 व्या षटकात आपली विकेट गमावली. मात्र कृणाल पांड्या ठाम राहिला. पांड्याने 47 चेंडूत 73 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच वेळी, कोहलीने 51 धावा केल्या आणि 4 चौकार मारले. आरसीबीने 19 व्या षटकात सामना जिंकला आणि दोन गुण जोडले.