Mumbai Indians vs Lucknow Super Giants : पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की ही फ्रँचायझी इतकी यशस्वी का आहे. आयपीएल 2025 मध्ये खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन करत हार्दिक पांड्याच्या संघाने सलग पाचवा विजय मिळवला आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने चांगली कामगिरी केली आणि लखनौ सुपर जायंट्सचा एकतर्फी 54 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादव आणि रायन रिकेल्टन यांच्या शानदार अर्धशतकांनंतर, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि विल जॅक्स यांच्या धारदार गोलंदाजीमुळे हा विजय निश्चित झाला. यासह, मुंबई आयपीएलमध्ये 150 विजय नोंदवणारा पहिला संघ बनला.

मुंबई इंडियन्सचा धमाका

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली, पण तिसऱ्या षटकातच संघाला मोठा धक्का बसला. रोहित शर्माने दोन षटकार मारून आपला चांगला फॉर्म दाखवला. पण नंतर 5 चेंडूत 12 धावा काढून तो बाद झाला. येथून रायन रिकेलटनसोबत विल जॅक्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली आणि धावसंख्या 88 पर्यंत नेली. यादरम्यान, रिकेलटनने 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर 32 चेंडूत 58 धावा करून आऊट झाला. 

तिलक वर्मा (6 धावा) आणि कर्णधार हार्दिक पांड्या (5 धावा) यांना फारसे काही करता आले नाही. पण एका टोकापासून सूर्यकुमार यादव वेगवान धावा काढल्या आणि 28 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. शेवटी, कॉर्बिन बॉशने 10 चेंडूत 20 धावा आणि नमन धीरने 11 चेंडूत नाबाद 25 धावा करत मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या गाठून दिली. लखनौ सुपर जायंट्सकडून मयंक यादव आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. 

मिचेल मार्श आणि निकोलस पूरन नडले पण...

मुंबईने दिलेल्या 216 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना लखनौची सुरुवात खराब झाली. एडेन मार्क्रमला फक्त 09 धावा करता आल्या. यानंतर मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी वेगाने धावा काढल्या. लखनौने पॉवरप्लेमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात 60 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर संघाने आपली लय गमावली आणि नियमित अंतराने विकेट गमावल्या. मिचेल मार्श 24 चेंडूत 34 धावा करून आऊट झाला. 15 चेंडूत 27 धावा काढून निकोलस पूरन पॅव्हेलियनमध्ये परतला. 

ऋषभ पंतची बॅट पुन्हा एकदा शांत

पुन्हा एकदा कर्णधार ऋषभ पंतची बॅट शांत राहिली. तो फक्त 04 धावा करू शकला. आयुष बदोनीने 22 चेंडूत 35 धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. डेव्हिड मिलरला 16 चेंडूत फक्त 24 धावा करता आल्या. अब्दुल समदही स्वस्तात बाद झाला. तो दोन धावा करून बाद झाला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने 4 षटकांत 22 धावा देत 4 विकेट घेतले. विल जॅक्सने दोन विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्टने 20 धावा देऊन तीन विकेट घेतल्या.