IPL 2023: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला शुक्रवारी अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर देहरादूनच्या येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीसीसीआयची मेडिकल टीम पंतवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, ऋषभ इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं (Dehi Capitals) नेतृत्व करतो. मात्र, अपघातामुळं त्याचं आयपीएलच्या पुढच्या हंगामात खेळणं जवळपास अशक्य मानलं जातंय. यामुळं दिल्लीचा संघ आता नव्या कर्णधाराच्या शोधात आहे.


भारतीय संघ येत्या 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआय़नं भारतीय संघाची घोषणा केलीय. या मालिकेत ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आलीय. यानंतर पंतच्या दुखापतीबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायेत. तसेच पंत आयपीएलच्या पुढच्या हंगामात दिल्लीच्या संघाचं नेतृत्व करताना दिसेल की नाही? याकडंही सर्वांचं लक्ष लागलंय. 


दिल्लीच्या संघाकडं कर्णधारपदासाठी दोन पर्याय
पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स एका मजबूत खेळाडूकडं कर्णधारपदं सोपवण्याचा प्रयत्न करेल. यासाठी डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ हे चांगले पर्याय आहेत. वॉर्नर हा अनुभवी खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांसोबतच त्यानं आयपीएलमध्येही अप्रतिम कामगिरी केलीय. दुसरीकडं पृथ्वी शॉ तरुण असण्यासोबतच प्रतिभावानही आहे.


डेव्हिड वॉर्नरचं उत्कृष्ट नेतृत्व
डेव्हिड वॉर्नर आयपीएल 2014 ते 2021 पर्यंत सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. त्यानंतर दिल्लीच्या संघानं आयपीएल 2022 साठी डेव्हिड वॉर्नरवर मोठी बोली लावत त्याचा संघात समावेश केला. त्यानंतर यंदाच्या हंगामासाठी त्याला संघात कायम ठेवलं. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखाली हैदराबादच्या संघानं आयपीएलचा खिताबही जिंकलाय. त्यामुळं त्याला कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. याच कारणामुळं तो कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदारही मानला जात आहे.


पृथ्वी शॉची कामगिरी
युवा फलंदाज पृथ्वी शॉ अंडर-19 क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवलं आहे. यासोबतच देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईची जबाबदारी सांभाळतोय. पृथ्वीचा अनुभव फारसा नसला तरी तो प्रतिभावान आहे. त्यामुळं दिल्ली कॅपिटल्स पृथ्वी शॉकडं कर्णधारपदं सोपवू शकते. 


दिल्ली कॅपिटल्सचा संघ:
ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मनीष पांडे, फिलिप सॉल्ट, रिले रुसो, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, अॅनरिक नॉर्खिया, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, मुकेश कुमार.


हे देखील वाचा-