नवी दिल्ली : आयपीएलचा (IPL 2024) समारोप झाल्यानंतर 1 जूनपासून टी-20  वर्ल्ड कप (T20 World Cup) सुरु होणार आहे. टी-20  वर्ल्डकपसाठी टीमची घोषणा 1 मेपूर्वी करण्याच्या सूचना आयसीसीनं दिल्या आहेत. त्यानुसार स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 20 संघांना त्यांच्या टीममधील खेळाडूंच्या नावांची घोषणा 1 मेपूर्वी करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर टीम इंडियातून (Team India) कुणाला संधी मिळेल याकडे लक्ष लागलं आहे. रिषभ पंतनं (Rishabh Pant) यंदाच्या आयपीएलमध्ये तीन अर्धशतकं झळकावली आहेत. रिषभ पंतनं काल झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमध्ये 43 बॉलमध्ये 88 धावांची खेळी केली होती. त्यामध्ये त्यानं  8 सिक्स आणि पाच चौकार मारले होते. रिषभच्या 88 धावांच्या जोरावर दिल्लीनं 4 बाद 224 धावांपर्यंत मजल मारली होती. 


रिषभ पंतची आयपीएलमध्ये दमदार कामगिरी  


रिषभ पंतनं यंदाच्या आयपीएलमध्ये तीन अर्धशतकांसह 342 धावा केल्या आहेत. रिषभ पंतनं काल केलेल्या कामगिरीच्या जोरावर टी-20 वर्ल्ड कपच्या टीममधील समावेशासाठी आपली दावेदारी पक्की केली आहे. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू सायमन डूलनं रिषभ पंतबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.रिषभ पंत मधल्या फळीत बॅटिंग करण्यासाठी योग्य नसून त्याला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी संधी दिली पाहिजे. रिषभ पंत अखेरच्या ओव्हरमध्ये फलंदाजीला आला आणि लगेच मोठं मोठे फटके मारु लागला असं होत नाही. रिषभला त्याच्या खेळीचा विस्तार करताना वेळ घ्यावा लागतो. त्यामुळं त्याला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला पाठवलं पाहिजे. रिषभनं ज्या प्रकारे गुजरात विरुद्ध खेळी केली तशाच प्रकारचे तो धावा करु शकतो, असं सायमन डूल म्हणाले. 


सायमन डूल यांनी क्रिकबझशी बोलताना रिषभ पंतला टी-20 वर्ल्डकपमध्ये संधी मिळाल्यास त्यानं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे, असं म्हटलं. रिषभ पंत स्लॉगर म्हणजेच अखेरच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करणारा फलंदाज नसून त्याला जम बसवण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळं त्याला तिसऱ्या स्थानावर संधी दिली पाहिजे, असं डूल म्हणाले. पण, विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर तिसऱ्या स्थानावर तो खेळू शकेल, का असा प्रश्न असेल सायमन डूल म्हणाले. 


  
जॉय भट्टाचार्य यांनी रिषभ पंतला चौथ्या स्थानावर फलंदाजीला पाठवलं पाहिजे असं मत मांडलं. यावर सायमन डुल यांनी म्हटलं की तसं केल्यास टीम इंडियाच्या मधल्या फळीची जबाबदारी केवळ डावखुऱ्या फलंदाजांवर राहील. त्यामुळं शिवम दुबे, रिंकू सिंग, रविंद्र जडेजा हे जर पाच, सहा आणि सातव्या स्थानावर खेळले आणि रिषभ पंत चौथ्या स्थानी खेळला तर मधल्या फळीत सर्व डावखुरे फलंदाज होऊ शकतात.  


   
विकेट कीपर कोण असणार?


टीम इंडियात विकेटकीपर कोण असेल याविषयी देखील चर्चा सुरु आहेत. आयपीएलमध्ये संजू सॅमसननं देखील चांगली कामगिरी केलेली आहे. दिनेश कार्तिकची कामगिरी देखील निवड समितीच्या सदस्यांना विचारात घ्यावी लागणार आहे. त्यामुळं निवड समिती रिषभ पंत, संजू सॅमसन आणि दिनेश कार्तिक यांच्यापैकी कुणाला संधी देणार याकडे लक्ष लागलंय.  


संबंधित बातम्या : 



Video: ट्रिस्टन स्टब्सच्या डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या फील्डिंगमुळं दिल्लीला विजयाचा गुलाल, गुजरातचा खेळ बिघडवणारा क्षण