Rohit Sharma PBKS: आयपीएलचा 18 वा हंगाम चौकार-षटकारांच्या आतिषबाजीने रोमहर्षक बनला आहे. अब्जावधी क्रिकेट चाहत्यांचं मैदानात आणि मैदानाबाहेरही प्रेम सर्वच संघांना मिळत आहे. त्यातच, नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांची जुगलबंदी सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यंदा टीम मुंबई इंडियन्सचा कर्णधार बदलल्याने अगोदरच नाराज असलेल्या मुंबईकरांना नवा कर्णधार हार्दीक पांड्याच्या कृतीमुळे खवळलं आहे. त्यामुळे, रोहित विरुद्ध हार्दीक असाही सामना नेटीझन्समध्ये रंगला. त्यातूनच पुढील हंगामात रोहित शर्मा मुंबईची साथ सोडून पंजाबचा हात धरू शकतो, असे वृत्त माध्यमांत झळकल्याने दोन्ही संघांत आणि संघांच्या चाहत्यांमध्ये उत्कंठा होती. मात्र, यावर आता पंजाब संघाने स्पष्टीकरण दिलं आहे. 


मुंबई इंडियन्समधील खेळाडूंचे काही व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, हार्दीककडून रोहितचा अवमान करण्यात येत असल्याचे दिसून आल्याने त्याचा चाहता वर्ग संतप्त आहे. तर, रोहित आता मुंबई इंडियन्सला सोडून जातो की काय, अशाही चर्चा होत्या. पुढील आयपीएल हंगामात रोहितला पंजाबकडून संधी मिळणार असल्याचं बोललं जात. पण, यावर संघाच्या प्रवक्त्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यामुळे, मुंबईच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.


मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा नाराज असल्याच्या चर्चेला निश्चितच इतर संघांच्या मालकांकडून संधी मानण्यात येत आहे. त्यातच, पंजाब किंग्सची मालकीण प्रिती झिंटाने एक विधान केल्याचं सोशल मीडियात चर्चेत आहे. पुढील 2025 च्या आयपीएल हंगामात रोहित शर्माला संघात खरेदी करण्यास मी जीवाची बाजी लावेल, असे प्रितीने म्हटल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तसे कुठलेही विधान प्रितीने केले नाही. त्यामुळे, रोहित शर्मा मुंबई इंडियन्समध्येच कायम राहणार असल्याचे सध्यातरी स्पष्ट झाले आहे. 


पंजाब किंग्सची मालकीण प्रिती झिंटाने रोहित शर्माच्या पंजाब संघामधील सहभागावर कुठलेही भाष्य केलं नाही. रोहितबाबत प्रिती झिंटा यांच्या नावाने जे काही वृत्त माध्यमांत झळकत आहे, ते चुकीचे असल्याचे पंजाब किंग्सच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे, रोहित शर्मा भविष्यात किंवा 2025 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार होणार हे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट झाले. अर्थातच, पंजाब संघाच्या या स्पष्टीकरणामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना सुखद बातमी मिळाली, असे म्हणता येईल.


संबंधित बातम्या:


मुंबईविरुद्ध नाणेफेकीचा झोल...; ड्यू प्लेसिसने कमिन्सला सर्वच सांगितलं, तोही ऐकून आश्चर्यचकित


काव्या मारन त्या क्षणी लगेच उठली अन् नाचली; फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं?, जाणून घ्या