RCB vs SRH, IPL 2022 : ब्रेबॉन स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 72 चेंडू आणि नऊ गडी राखून पराभव केला. आरसीबीने दिलेले 69 धावांचं मापक आव्हान हैदराबादने आठ षटकात एका गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले. हैदराबादकडून अभिषेक शर्माने 47 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. कर्णधान केन विल्यमसन 16 तर राहुल त्रिपाठी 7 धावा काढून नाबाद राहिला. आरसीबीकडून हर्षल पटेल याने एकमेव विकेट घेतली. हैदराबादकडून मिळालेल्या दारुण पराभवानंतर फाफ डु प्लेसिस याने स्पष्टच प्रतिक्रिया दिली. नेमकी चूक कुठे झाली, हे त्याने स्पष्टच सांगितले.


डु प्लेसिसने सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार समारंभात पराभवाचं कारण सांगितलं. डु प्लेसिस म्हणाला की, 'आम्ही सुरुवातीच्या षटकात चार-पाच विकेट गमावत सामना घालवला. सुरुवातीला गोलंदाजांना मदत मिळत होती, पण याचा सामना करण्याचा आयडिया असायला हवी. पण आम्ही सुरुवातीलाच विकेट गमावल्या. त्यामुळे सामना तिथेच आमच्या हातून गेला होता.'  


सुरुवातीची काही षटकं संपल्यानंतर खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक झाली होती. जर सुरुवातीला विकेट गेल्या नसत्या तर मोठी धावसंख्या उभारता आली असती. फलंदाजीसाठी ही खेळपट्टी पोषक असेल, असे वाटले होते. पण कोणत्याही खेळपट्टीवर तुम्हाला फलंदाजी करताना सावधनाता बाळगावी लागते, असे फाफ डु प्लेसिस म्हणाला. 


सामन्याच्या दुसऱ्याच षटकात मार्को जानसेन याने लागोपाठ दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्या. त्यानंतर अनुज रावतला बाद करत आरसीबीला एकाच षटकात तीन धक्के दिले. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने मार्के जानसेनच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. तो म्हणाला की, मार्को जानसेन याने आपल्या पहिल्याच षटकात घातक गोलंदाजी केली. दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करत त्याने विकेट घेतल्या. या षटकामुळेच आम्ही सामन्यात मागे राहिलो....


दरम्यान, हैदराबादने यंदाच्या हंगमातील सलग पाचवा विजय नोंदवला आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर हैदराबादने दणक्यात पुनरागमन करत सलग पाच विजय मिळवले. यासह दहा गुण घेत हैदराबादने गुणतालिकेत दुसरं स्थान पटाकवले आहे. तर आरसीबीचा हा तिसरा पराभव आहे. आठ सामन्यात आरसीबीने पाच विजय मिळवले आहे. या पराभवासह आरसीबी गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे.