Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders: आयपीएल 2024 च्या 10 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) 7 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम खेळून विराट कोहलीच्या नाबाद 83 धावांच्या खेळीमुळे आरसीबीने 20 षटकांत 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरने 16.5 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला. केकेआरसाठी फिल सॉल्टने 20 चेंडूत 30 धावा, सुनील नरेनने 22 चेंडूत 47 धावा, व्यंकटेश अय्यरने 30 चेंडूत 50 धावा आणि श्रेयस अय्यरने 24 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. यासह घरच्या संघाची विजयी मालिकाही खंडित झाली आहे. केकेआरने बेंगळुरूमध्येही आपला मजबूत विक्रम कायम राखला.
केकेआरने खास गणित मोडलं-
आयपीएल 2024 च्या हंगामात आतापर्यंत 9 सामने झाले होते. आज आरसीबी आणि केकेआरचा 10 वा सामना होता. मात्र पहिल्या 9 सामन्यात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या संघाने विजय मिळवला होता. परंतु आज केकेआरने आक्रमक खेळ दाखवत आरसीबीचं घरचं मैदान असणाऱ्या एम. चिन्नास्वामी मैदानावर आरसीबीचा पराभव केला आहे. त्यामुळे या हंगामात घराबाहेर विजय मिळवणारा केकेआर हा पहिला संघ ठरला असून यासोबतच आयपीएलचं खास गणितही केकेआरने मोडलं आहे.
व्यंकटेश अय्यरची तुफानी खेळी-
व्यंकटेश अय्यरने अवघ्या 29 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. व्यंकटेश अय्यर 30 चेंडूत 50 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 3 चौकार लगावले.
विराट कोहलीच्या नाबाद 83 धावा
विराट कोहलीने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने 59 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. आयपीएल 2024 मधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या मिचेल स्टार्कची विराट कोहलीने चांगलीच धुलाई केली. विराट कोहली आणि मिचेल स्टार्क पहिल्यांदाच आयपीएलमध्ये आमनेसामने आले. स्टार्कच्या पहिल्या षटकांतील पहिल्याच चेंडूत चौकार मारत डावाची सुरुवात केली. त्यानंतर संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टार्कला विराट कोहलीने एक खणखणीत षटकार आणि दोन चौकार लगावले.
कोहली अन् गंभीरची भेट ठरली खास आकर्षण
कोहली आणि गंभीर यांच्यात चाहत्यांना वाद होण्याची अपेक्षा असतानाच दोघांमध्ये आज मैत्रीपूर्ण संबंध पाहायला मिळाले. टाइम आऊट दरम्यान गंभीर मैदानावर आला आणि येताच त्याने सर्वप्रथम कोहलीची भेट घेतली आणि त्याला मिठी मारली. या सुंदर क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गंभीर येतो आणि सर्वप्रथम तो कोहलीशी हस्तांदोलन करतो आणि नंतर त्याला मिठी मारतो. यादरम्यान दोघांमध्ये काही संवाद होतो आणि दोन्ही दिग्गजांच्या चेहऱ्यावर हसू उमटते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक चाहते आश्चर्यचकित झाले.
संबंधित बातम्या:
विराट कोहली अन् गौतम गंभीरची भर मैदानात गळाभेट; रवी शास्त्री अन् सुनील गावसकरांची मजेशीर कमेंट