Rajat Patidar RCB IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा दमदार फलंदाज रजत पाटीदारच्या (Rajat Patidar Health Updat) तब्येतीबाबतची अपडेट समोर आली आहे. रजत पाटीदारवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. रजतला यंदाच्या आयपीएलमध्ये एकही सामना खेळता आलेला नाही. तो दुखापतीमुळे आयपीएल 2023 च्या सुरुवातीपासूनच बाहेर आहे. आरसीबीने यंदाच्या हंगामाच्या आधीच सांगितलं होतं की रजत आयपीएल खेळू शकणार नाहीत. टाचेच्या दुखापतीमुळे तो यंदाच्या सीझनला मुकला आहे. 


बंगळुरुच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी


आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या रजतने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. रजत पाटीदारने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शस्त्रक्रियेनंतरचा एक फोटो पोस्ट केला आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रजत ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रजत पाटीदारची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. याचा संपूर्ण खर्च बीसीसीआयने उचलला आहे. 


रजत पाटीदारची शस्त्रक्रिया यशस्वी


रजत पाटीदारने इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याच्या तब्येतीबाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअक केली आहे. त्याने एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, 'मी माझ्या सर्व चाहत्यांना अपडेट देऊ इच्छितो. मी अलीकडेच एका दुखापतीवर शस्त्रक्रिया केली, या दुखापतीमुळे मी मागील काही काळ त्रस्त होतो. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यात सुधारणा होत आहे. मला हे सांगायला आनंद होत आहे. मी पुनरामनाच्या तयारीच्या मार्गावर आहे. मी मैदानात परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार. मी लवकरच परत येईन.'






 


चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव


रजतच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि मैदानात परतण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं की, "चॅम्पियन लवकर बरा हो." आणखी एका यूजरने लिहिले की, "तू लवकर ठीक होऊन मैदानात ये, तू भारतासाठी चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करू शकतोस."






यंदा आयपीएलमधील त्याची जागा विजय वैशाकनं घेतली


आयपीएलच्या गेल्या मोसमातील आठ डावांमध्ये रजत पाटीदारने बेंगळुरूसाठी 55.50 टक्के सरासरीने 33 धावा केल्या होत्या. यंदाच्या मोसमात त्याच्या जागी विजय वैशाकचा आरसीबी संघात समावेश करण्यात आला.