Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score: राजस्थान रॉयल्सने (RR) दिल्ली कॅपिटल्ससमोर (DC) 186 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रियान परागने 45 चेंडूत 84 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निर्मण घेतला. राजस्थानकडून फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाला. जैस्वालने 7 चेंडूत 5 धावा केल्या. दिल्लीचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने त्याला त्रिफळाचीत केले. त्यानंतर 5 वे षटक घेऊन आलेला खलील अहमदने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला झेलबाद केले. सॅमसनने 15 धावा केल्या. 






जॉस बटलर आणि रियान परागने सावध खेळी करत राजस्थानला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात बटलरला अपयश आले. कुलदीप यादवच्या फिरकीवर बटलर बाद झाला. बटलरने 16 चेंडूत केवळ 11 धावा केल्या. कुलदीपने बटलरला LBW बाद केले. त्यानंतर आर. अश्विन फलंदाजीसाठी आला. अश्विनने यावेळी आक्रमक फलंदाजी केली. त्याने  19 चेंडूत 29 धावा केल्या. यामध्ये खणखणीत 3 षटकार देखील लगावले. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर अश्विन बाद झाला. 


अश्विन बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेल मैदानात दाखल झाला. मात्र जुरेलला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले. तो 12 चेंडूत 20 धावा करत माघारी परतला. ॲनरिक नॉर्टजेने त्याला त्रिफळाचीत केले आणि राजस्थानला पाचवा धक्का बसला. यानंतर रियान पराग आणि शिमरॉन हेटमायरने आक्रमक फलंदाजी केली. रियान परागने 45 चेंडूत 84 धावा केल्या, तर हेटमायरने 7 चेंडूत 14 धावा झळकावल्या.


20 व्या षटकांत 4,4,6,4,6,1


ॲनरिक नॉर्टजेच्या 20 व्या षटकांत रियान परागने तुफान फटकेबाजी केली. शेवटच्या षटकांत परागने 25 धावा केल्या. 4,4,6,4,6,1 अशा धावा परागने शेवट्या षटकांत झळकावल्या.


कोणत्या गोलंदाजाला किती विकेट्स-


खलील अहमद, मुकेश कुमार, ॲनरिक नॉर्टजे, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाल्या.


दिल्ली कॅपिटल्सची Playing XI
डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (w/c), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, ॲनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार


राजस्थान रॉयल्सची Playing XI
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान


राजस्थान सध्या दुसऱ्या स्थानावर-


राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या दुसऱ्या क्रमाकांवर आहे. राजस्थानचे 2 गुण आहेत. राजस्थानचा आजचा दिल्लीविरुद्ध दुसरा सामना असून पहिला सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 20 धावांनी पराभव केला होता. 


दिल्ली आठव्या क्रमांकावर-


दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत सध्या आठव्या क्रमांकावर आहे. आज दिल्लीचा राजस्थानविरुद्ध दुसरा सामना असून पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सकडून 4 विकेट्सने पराभव झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत 2 गुण मिळवण्यासाठी दिल्ली प्रयत्न करताना दिसेल.