RR vs GT Turning Points : संजू सॅमसनच्या राजस्थान संघाला यंदाच्या हंगामातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. बुधवारी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या रोमांचक सामन्यात गुजरातने राजस्थानचा तीन विकेटने पराभव केला. शुभमन गिलच्या गुजरात संघाने अखेरच्या दोन षटकांमध्ये सामना जिंकला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना तीन विकेटच्या मोबदल्यात 196 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल गुजरातने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. सामन्यात 18 षटकांपर्यंत राजस्थानचेच पारडे जड होते. पण तरीहीही सामना गुजरातने जिंकला. अखेरच्या 12 चेंडूवर गुजरातला विजयासाठी 12 चेंडूमध्ये 37 धावांची गरज होती, त्यावेळी राहुल तेवातिया आणि राशिद खान फलंदाजी करत होते. या दोघांनी विजय खेचून आणला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या राशीद खान याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. राशीने गोलंदाजीमध्ये 4 षटकात फक्त 18 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. तर फलंदाजीमध्ये त्याने 11 चेंडूमध्ये नाबाद 24 धावांची खेळी केली.






अखेरच्या 12 चेंडूमध्ये सामना फिरवला, गुजरातची कमाल 


राजस्थानच्या कुलदीप सेन यानं गुजरातला सुरुवातीलाच 3 धक्के घेत बॅकफूटवर ढकलले होते. अखेरच्या 12 चेंडूमध्ये गुजरातला 37 धावांची गरज होती, त्यावेळी संजू सॅमसन यानं चेंडू कुलदीप सेन याच्याकडे दिला. कुलदीप सेन भन्नाट फॉर्मात असल्यामुळे राजस्थान सामना जिंकणार, असे म्हटले जात होते. पण राशीद खान आणि राहुल तेवातिया यांच्या मनात वेगळेच होते.  19 व्या षटकात राशीद-राहुल यांनी कुलदीपला तब्बल 20 धावा चोपल्या. अखेरच्या षटकात गुजरातला 17 धावांची गरज होती. राजस्थानकडून आवेश खान गोलंदाजीसाठी आला होता. राहुल तेवातिया आणि राशिद खान यांनी आवेश खान याचाही पिटाई केली. अखेरच्या चेंडूवर चौकार मारत राशिद खानने गुजरातला सनसनाटी विजय मिळवून दिला. कुलदीप सेन यानं 19 व्या षटकांमध्ये नो चेंडू फेकला, त्यावर राशीद आणि राहुलने चार धावा वसूल केल्या. त्याशिवाय कुलदीपने याच षटकांमध्ये दोन चेंडू वाईड फेकले. त्याशिवाय आवेश खान यानेही एक चेंडू वाइट फेकला, त्यावरही अतिरिक्त धाव घेतली. हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.  आवेश खान आणि कुलदीप सेन यांना अखेरच्या दोन षटकांमध्ये 37 धावांचा बचाव करता आला नाही. 






राजस्थानचा यंदाच्या हंगामातील पहिला पराभव - 


यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. अटीतटीच्या सामन्यात गुजरातने राजस्थानचा तीन विकेटने पराभव केला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 3 विकेटच्या मोबदल्यात 196 धावांचा डोंगर उभारला. रियान परागने राजस्थानकडून वादळी खेळी केली. परागने 48 चेंडूमध्ये 76 धावांचे योगदान दिले. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यानं 38 चेंडूमध्ये 68 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरदाखल गुजरात 20 षटकांमध्ये 199 धावा केल्या. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिल यानं 72 धावांची झंझावती खेळी केली. साई सुदर्शन यानं 35 धावांचं योगदान दिलं. त्याशिवाय राहुल तेवातिया यानं 11 चेंडूमध्ये 22 धावांचं महत्वाचं योगदान दिलं राशीद खान यानं 11 चेंडूमध्ये नाबाद 24 धावांची खेळी केली.