KKR vs RR, IPL 2024 : हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं! .. होय जोस बटलर यानं एखाद्या चित्रपाटाला लाजवेल असा लढा दिलाय. जोस बलटरच्या शतकाच्या बळावर राजस्थाननं 224 धावांचा यशस्वी पाठलाग केला. राजस्थाननं आयपीएलमधील सर्वात मोठा धावांचा पाठलाग केलाय. याआधीही हा विक्रम राजस्थानच्याच नावावर होता. कोलकात्यानं प्रथम फलंदाजी करताना 223 धावांचा डोंगर उभारला होता. राजस्थाननं अखेरच्या चेंडूवर 224 धावांचं लक्ष यशस्वी पार केले. राजस्थानकडून जोस बटलरनं नाबाद 107 धावांची भागिदारी केली. जोस बटलरच्या वादळी फलंदाजीच्या बळावर अखेरच्या पाच षटकात राजस्थाननं सामना जिंकला. कोलकात्याकडून सुनील नारायण यानं शतक ठोकलं होतं. धावांचा पाठलाग करताना जोस बटलर यानं शतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमध्ये एकाच सामन्यात दोन शतकं होण्याची दुसरीवेळी आहे. याआधी आरसीबी आणि राजस्थान सामन्यातही दोन शतकं झाली होती. आरसीबीकडून विराट कोहलीनं तर राजस्थानकडून जोस बटलर यानं शतक ठोकलं होतं. 


जोस द बॉस - 


सलामी फलंदाजी जोस बटलर यानं कोलकात्याविरोधात झंझावती शतक ठोकत राजस्थानला सनसनाटी विजय मिळवून दिला. राजस्थानला 15 चेंडूमध्ये 38 धावांची गरज होती, हातात फक्त दोन विकेट होत्या. जोस बटलर यानं एकट्यानेच 15 चेंडू खेळून राजस्थानला विजय मिळवून दिला. जोस बटलर यानं 60 चेंडूमध्ये नाबाद 107 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये बटलरने 6 षटकार आणि 9 चौकार ठोकले. जोस बटलर यानं पहिल्या चेंडूपासून संयमी खेळी केली. दुसऱ्या बाजूला विकेट पडत असताना बटलर संयमी खेळत होता. पण अखेरच्या 10 षटकांमध्ये बटलरनं आक्रमक फलंदाजी करत विजय हिसकावला. 






पराग, पॉवलची शानदार साथ - 


यशस्वी जायस्वाल 19 धावा काढून तंबूत परतला. फॉर्मात असलेला संजू सॅमसनही 12 धावा काढून बाद झाला. दोन विकेट झटपट गेल्यानंतर जोस बटलर यानं रियान पराग याच्यासोबत डावाला आकार दिला. दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी झाली. रियान पराग यानं 14 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि चार चौकार ठोकले. रियान बाद झाल्यानंतर राजस्थानची फलंदाजी पुन्हा ढेपाळली. ध्रुव जुरेल, अश्विन आणि हेटमायर स्वस्तात तंबूत परतले. पण पॉवेल यानं बटलरच्या साथीने पुन्हा एकदा डावाला आकार दिला. पॉवेल यानं 13 चेंडूत 26 धावांची खेळी केली. पॉवेल यांन 3 षटकार लगावले. पॉवेल बाद झाल्यानंतर बोल्टही लगेच बाद झाला. पण बटलरने सामना जिंकून दिला.