DC, IPL 2022 Marathi News : दिल्ली कॅपिट्लसची संकटे कमी होण्याची नाव घेत नाहीत. दिल्ली संघाच्या नेट बॉलरला कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीचा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ यंदाच्या आयपीएलमधून बाहेर जाण्याचे संकेत मिळाले आहेत. साहायक प्रशिक्षक शेन वॉटसन यांनी पृथ्वी शॉ उर्वरित आयपीएलला मुकण्याची शक्यता वर्तवली आहे. पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीत डेविड वॉर्नरसोबत दुसरा फलंदाज कोण? असा प्रश्न दिल्लीपुढे उभा राहिला.. मागील तीन सामन्यात दिल्लीने दोन फलंदाजांना अजमावलेय.. मात्र त्यांना छाप पाडता आलेली नाही. 


मे महिन्याच्या सुरुवातीपासून पृथ्वी शॉ संघाबाहेर आहे. पृथ्वी आजारी असल्यामुळे सामन्यांना मुकला होता. ताप आल्यामुळे 8 मे रोजी पृथ्वी शॉ रुग्णालयातही दाखल झाला होता. पृथ्वी शॉने ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पृथ्वी शॉला टायफॉड झाला आहे. त्यामुळे तो आयपीएलला मुकण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉने अखेरचा सामना लखनौविरोधात एक मे रोजी खेळला होता... तेव्हापासून पृथ्वी शॉ संघाबाहेर आहे. आता शेन वॉटसन याने प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठी अपडेट दिली आहे. त्यानुसार पृथ्वी शॉ आयपीएलमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे. 
 
वॉटसन काय म्हणाला?
मागील काही दिवसांपासून पृथ्वी शॉला तापाची समस्या आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पण अद्याप तो सावरलेला नाही. त्याला कोणत्या कारणामुळे हा त्रास होतोय, हे अद्याप मला समजले नाही. मागील काही सामन्यात पृथ्वी शॉ नसल्याचा फटका आम्हाला बसलाय. पृथ्वी शॉ चांगला फलंदाज आहे, जगातील दिग्गज गोलंदाजांची त्याने मनसोक्त धुलाई केला आहे. तो नसणे संघासाठी मोठा धक्का आहे.  पृथ्वी शॉ लवकर बरा होऊन पुनरागमन करेल असा अंदाज आहे. पण दुर्देवीपणे तो आमच्या अखेरच्या दोन सामन्यासाठी उपलब्ध नसेल. 


दिल्लीची कामगिरी कशी?
ऋषभ पंतच्या नेतृत्तावतील दिल्ली कॅपिट्ल्सचा यंदाचा हंगाम चढउताराचा राहिलाय.. दिल्लीने मागील सामन्यात राजस्थानचा पराभव करत प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलेय. दिल्लीने 12 सामन्यात सहा विजय मिळवत 12 गुण मिळवले आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामन्यात विजय गरजेचा आहे. अशामध्ये पृथ्वी सारखा विस्फोटक फलंदाज बाहेर जाणे दिल्लीसाठी मोठा धक्का आहे.