अहमदनगर (शिर्डी)  : यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत झालेल्या सात मॅचमध्ये चारवेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबईच्या टीमचं नेतृत्त्व देखील संघ व्यवस्थापनाकडून बदलण्यात आलं आहे. मात्र, मुंबईला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. मुंबईनं शेवटचं आयपीएल विजेतेपद 2020 मध्ये मिळवलं होतं. यंदाच्या आयीपएलमध्ये देखील मुंबई इंडियन्सची कामगिरी समाधानकारक होत नसताना संघाच्या मालक असलेल्या नीता अंबानी (Nita Ambani) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीतील साईबाबांच्या चरणी लीन झाल्या आहेत. नीता अंबानी (Nita Ambani At Shirdi) या साईबाबांच्या धुपारतीनंतर साईमंदिरात दाखल झाल्या होत्या. 


मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यापूर्वी नीता अंबानी साईमंदिरात दाखल झाल्या होत्या. नीता अंबानी साई मंदिरात दाखल झाल्या त्यावेळी त्यांनी मुंबई इंडियन्सची जर्सी घातलेली होती. त्यामुळं त्या मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी प्रार्थना करण्यासाठी आल्याची चर्चा सुरु झाली आहे. 


नीता अंबानी आज शिर्डीत दाखल झाल्या असल्या तरी यापूर्वी देखील आयपीएल सुरु असताना त्या साई मंंदिरात आल्या होत्या. नीता अंबानी यांनी आज शिर्डीत साईबाबांच्या धुपारतीनंतर मंदिरात दाखल होत प्रार्थना केली. नीता अंबानी घातलेली मुंबई इंडियन्सची जर्सी लक्षवेधी ठरली.  


आज मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या आयपीएलमधील आठवी मॅच राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळत आहे. या मॅचपूर्वी नीता अंबानी शिर्डीत दाखल झाल्या आणि त्यांनी प्रार्थना केली.  मुंबई इंडियन्सची जर्सी घालून त्या साई दर्शनाला पोहोचल्या होत्या. 


मुंबईसाठी यंदाचं आयपीएल संमिश्र


मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटनं नव्या कॅप्टनच्या नेतृत्त्वासह आयपीएलमध्ये संघ उतरवण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सला पाचवेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला बाजूला ठेवत हार्दिक पांड्याला गुजरातमधून ट्रेड करत मुंबईच्या संघात आणलं गेलं. हार्दिक पांड्याकडे नेतृत्त्व देऊनही मुंबईला अपेक्षेप्रेमाणं कामगिरी करता आलेली नाही. गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदरबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबईला पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्जला पराभूत केलं आहे. 


आज राजस्थान विरुद्ध मुंबईची लढत सुरु आहे. या लढतीत मुंबई इंडियन्सकडे राजस्थान रॉयल्सनं होम ग्राऊंडवर केलेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्सला यामध्ये यश येणार का हे पाहावं लागेल.  


संबंधित बातम्या :


Virat Kohli:विराट कोहलीच्या विकेटचं प्रकरण पेटलं, मोहम्मद कैफ मैदानात उतरला,अम्पायरिंगवर सडकून टीका, हर्षित राणाला माफी मागण्याचा सल्ला


Virat Kohli : ग्राऊंडवरील पंचांसोबत वाद घालणं महागात पडलं, विराट कोहलीला बीसीसीआयचा दणका, मोठा दंड भरावा लागणार