Rohit Sharma : आगामी आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार म्हणून नियुक्त केले. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मुंबईने याबाबतची माहिती दिली. अष्टपैलू हार्दिक पांड्याला मुंबईने नुकतेच गुजरातकडून 15 कोटी रुपयांना ट्रेड केले होते. आता रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माने 10 वर्षांपर्यंत मुंबईचा कर्णधार म्हणून खेळलाय. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा चषकावर नाव कोरलेय. मुंबईने रोहित शर्माबद्दल खास पोस्ट लिहिली आहे.
रोहित शर्मा मागील आयपीएलपासून एकही टी 20 सामना खेळला नाही. गतवर्षी रोहित शर्माच्या नेतृ्त्वात मुंबईला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच मुंबईने भविष्याचा विचार करत हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा दिल्याचे बोलले जाते. रोहित शर्मा याचा एक व्हिडीओही मुंबईने पोस्ट केलाय. त्यामध्ये रोहित शर्माला खास धन्यवाद म्हटलेय.
काय म्हटलेय पोस्टमध्ये ?
24 एप्रिल 2013 रोहित तू मुंबईचा कर्णधार झालास... रोहित शर्माने विश्वास ठेवायला शिकवले, कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याची उर्जा दिली. पराभव किंवा विजय... तू नेहमीच हसात राहयाचाच.. 10 वर्षात सहा चषकावर नाव कोरले.. तू नेहमीच आमचा कर्णधार राहशील... तुझा वारसा Blue and Gold मध्ये नेहमीच राहणार आहे.
Thank you, 𝐂𝐚𝐩𝐭𝐚𝐢𝐧 𝐑𝐎! 💙
रोहित शर्माबद्दल मुंबईने काय म्हटले ?
हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये मुंबईने रोहित शर्माच्या नावाचाही उल्लेख केला. यामध्ये त्यांनी म्हटले की, रोहित शर्मा मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलाय. रोहित शर्माच्या शानदार नेतृत्वाबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. 2013 पासून कर्णधार म्हणून त्याचा कार्यकाळ शानदार राहिला. रोहित शर्माच्या नेतृत्वाने संघाला फक्त अतुलनीय यश मिळवून दिले नाही तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून स्थान पक्के केले आहे. रोहितच्या मार्गदर्शनाखाली मुंबई आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ बनला. एमआयला आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही मैदानावर आणि मैदानाबाहेर रोहित शर्माच्या मार्गदर्शन आणि अनुभवाची अपेक्षा करतोय. MI चा नवा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचे आम्ही स्वागत करतो आणि त्याला खूप खूप शुभेच्छा देतो.
रोहितचं आयपीएल करियर -
रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच आयपीएल चषकावर नाव कोरलेय. 2013 पासून रोहित शर्माने मुंबईची धुरा संभाळली होती. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने चषकावर नाव कोरले होते. रोहित शर्माची आयपीएलमधील कामगिरीही शानदार राहिली आहे. रोहितने 243 सामन्यात 6211 धावा चोपल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित शर्माने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
मुंबईचा कोच काय म्हणाले ?
हार्दिक पांड्याच्या निवडीवर मुंबईचे कोच महेला जयवर्धने यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मुंबईच्या नेतृत्वाचा मोठा इतिहास आहे. सचिन, हरभजन, रिकी पाँटिंग आणि रोहित शर्मा यांच्यापर्यंत सर्वांनी मुंबईचे नेतृत्व यशस्वी पार पाडले. मुंबई इंडियन्सला नेहमीच अपवादात्मक नेतृत्व लाभले आहे, ज्यांनी तत्काळ यशात योगदान देताना भविष्यासाठी संघ मजबूत करण्यावर नेहमीच लक्ष ठेवले आहे. हार्दिक पांड्या आयपीएल 2024 च्या मोसमासाठी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारणार आहे."