SRH vs LSG IPL 2024 Live Score:  आयुष बडोनी आणि निकोलस पूरनच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर लखनौने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 165 धावांपर्यंत मजल मारली. आयुष बडोनी यानं वादळी अर्धशतक ठोकत लखनौला सन्मानजक धावसंख्यापर्यत पोहचवलं. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने भेदक मारा केला. त्यानं 12 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. हैदराबादला विजयासाठी 20 षटकात 166 धावांचं आव्हान मिळालेय. 


लखनौची खराब सुरुवात 


लखनौचा कर्णधार केएल राहुल यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्यामुळे लखनौला दुसऱ्याच षटकात झटका बसला. विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉक अवघ्या दोन धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर मार्कस स्टॉयनिसलाही मोठी खेळी करता आली नाही. अवघ्या 21 धावांवर लखनौचे दोन फलंदाज तंबूत परतले होते. लखनौचा संघ अडचणीत असताना कर्णधार केएल राहुल यानं कृणाल पांड्याच्या साथीने डावाला आकार दिला. दोघांनी 36 धावांची भागिदारी करत  लखनौची धावसंख्या वाढवली. 


पांड्या-राहुलची झुंज 


कृणाल पांड्या आणि केएल राहुल यांची जोडी जमली असेच वाटत होते. पण पॅट कमिन्स यानं केएल राहुल याचा अडथळा दूर केला. केएल राहुल यानं जम बसल्यानंतर विकेट फेकल्याचा फटका लखनौला बसला. केएल राहुल यानं 33 चेंडूमध्ये 29 धावांची संथ खेळी केली. त्यानं आपल्या खेळीमध्ये एक चौकार आणि एक षटकार ठोकला. केएल माघारी परतल्यानंतर कृणाल पांड्याही लगेच तंबूत परतला. पांड्याला 24 धावा करता आल्या. पांड्याने 21 चेंडूमध्ये दोन षटकाराच्या मदतीने 24 धावांचं योगदान दिले. 66 धावांमध्ये लखनौला चार धक्के बसले होते. 


बडोनी-पूरन यांनी डाव सावरला 


11.2 षटकामध्ये लखनौने 4 विकेट गमावत फक्त 66 धावा केल्या होत्या. पाचच्या सरासरीनेच लखनौच्या धावा होत्या. लखनौचा संघाला मोठी धावसंख्या उभारता येणार नाही, असेच वाटत होते. पण निकोलस पूरन आणि आयुष बडोनी यांनी हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत लखनौची धावसंख्या वाढवली. पूरन आणि बडोनी यांनी 52 चेंडूत 99 धावांची शानदार भागिदारी केली. आयुष बडोनी याने 30 चेंडूत शानदार अर्धशतक ठोकले. या खेळीमध्ये त्याने नऊ चौकार ठोकले. तर निकोलस पूरन याने 26 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. या खेळीत त्याने एक षटकार आणि सहा चौकार ठोकले.


हैदराबादची गोलंदाजी कशी ?


भुवनेश्वर कुमार यानं भेदक मारा करत लखनौच्या फलंदाजांना रोखलं. भुवनेश्वर कुमारने 4 षटकात फक्त 12 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या.  पॅट कमिन्स याला एक विकेट मिळाली. शाहबाज अहमद, विजयकांत व्यासकांत, जयदेव उनादकट आणि टी नटराजन यांच्या विकेटच पाटी कोरीच राहिली.