चेन्नई : आयपीएलचं (IPL) 2024 चं पर्व पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings ) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यातील मॅचनं सुरु होणार आहे. सहावं विजेतेपद पटकावण्यासाठी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्त्वातील चेन्नई सज्ज आहे. चेन्नई आणि बंगळुरु 22 मार्चला आमने सामने येईल. या मॅचपूर्वीच्या एका सराव सत्रातील धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महेंद्रसिंह धोनीनं हेलिकॉप्टर शॉट लगावला आहे. 


चेन्नईच्या टीमचं सरावाचं सत्र सुरु असताना महेंद्रसिंह धोनी यानं हेलिकॉप्टर शॉट लगावला. यावेळी चेन्नईचे कोच मायकल हस्सी देखील तिथं उपस्थित होते.महेंद्रसिंह धोनीचं हे यंदाचं आयपीएल शेवटचं आयपीएल असेल अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, धोनीनं हेलिकॉप्टर शॉट मारत या आयपीएलसाठी तयार आणि फिट असल्याचं दाखवून दिलं आहे. यंदाचं आयपीएल महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. 


धोनीचा व्हिडिओ व्हायरल (MS Dhoni Helicopter Shot Video)


आयपीएलच्या 2023 च्या पर्वात धोनी लोअर मिडलला बॅटिंगला यायचा.गेल्या हंगामात गुडघ्याला दुखापत झालेली असून देखील त्यानं चेन्नईला पाचवं विजेतेपद मिळवून दिलं होतं. धोनीच्या चाहत्यांनी मात्र त्यानं टॉप ऑर्डरला बॅटिंगला यावं अशा अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. एम. एस. धोनीवर मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षी सर्जरी झाली होती.






धोनी ब्रिगेड सहाव्यांदा आयपीएलवर नाव कोरणार? 


चेन्नईचे सीईओ के. विश्वनाथ यांनी महेंद्रसिंह धोनी फिट असल्याची माहिती माध्यमांना दिली होती.चेन्नई त्यांचा 2024 च्या आयपीएलमधील प्रवास बंगळुरु विरुद्धच्या मॅचपासून सुरु करेल. चेन्नई सुपर किंग्जनं 2010,  2011, 2018, 2021,2023 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावलं आहे. आता धोनी ब्रिगेड सहाव्यांदा आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावण्याच्या इराद्यानं मैदानावर उतरेल. यावेळी महेंद्रसिंह धोनीनं सराव सत्रात हेलिकॉप्टर शॉट मारत विरोधी संघांना इशारा दिलेला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईची टीम  2023 प्रमाणं कामगिरी करु शकेल का हे पाहावं लागेल. 


दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचे पहिले दोन सामने घरच्या मैदानावर होणार आहेत.22 मार्चला चेन्नईची टीम फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्याविरुद्ध लढेल. चेन्नईचा दुसरा सामना 26 मार्चला गुजरात टायटन्स विरोधात होणार आहे. 2023 च्या आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जनं गुजरातचा पराभव करत पाचवं विजेतेपद मिळवलं होतं. आता, चेन्नई त्याची पुनरावृत्ती करणार की गुजरात टायटन्स वचपा काढणार हे पाहावं लागणार आहे.  तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध विशाखापट्टणम येथे होईल. 1 एप्रिलला ही लढत होईल. चेन्नई आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील लढत 5 एप्रिलला हैदराबादमध्ये होणार आहे. 


संबंधित बातम्या :


IPL: आयपीएलमध्ये एकही मॅच न खेळल्यास खेळाडूंना पैसे मिळतात का? पूर्ण रक्कम मिळते की नाही? जाणून घ्या नियम


Virat Kohli: 'आयपीएलची ट्रॉफी जिंकणं...'; विराट कोहलीचं भावूक विधान, 'किंग' न बोलण्याचही केलं आवाहन