MS Dhoni Viral Video: आयपीएल (IPL 2022) च्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) सनरायजर्स हैदराबादवर (SRH) 13 धावांनी विजय मिळवला. धोनी पुन्हा एकदा कर्णधार पदावर परतल्यानंतर पहिल्याच सामन्यात चेन्नईने चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या हैदराबादला मात दिली. पण या सामन्यात कॅप्टन कूल धोनी मात्र रागात दिसला. सामन्यात कमाल कामगिरी करणाऱ्या मुकेश चौधरीने (mukesh choudhary) 20 व्या षटकात टाकलेल्या एका वाईड बॉलवर धोनी चांगलाच भडकला होता. ज्यामुळे तो अगदी रौद्रअवतारात दिसून आला.

  


नेमकं काय घडलं?


चेन्नईनं दिलेल्या 203 धावांच्या दांडग्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ चांगली सुरुवात करु शकला. पण चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या अभिषेक शर्माची विकेट मुकेशनं घेतली आणि सामन्याची दिशाच बदलू लागली. मुकेशने त्यानंतर राहुल, वॉशिंग्टन, शशांक अशा महत्त्वाच्या सर्वच विकेट्स घेतल्या. पण अखेरच्या षटकात मात्र मुकेशने एक वाईड बॉल टाकला, ज्यानंतर कॅप्टन कूल भडकलेला दिसून आला. धोनीने इशाऱ्यांमध्ये चेंडू मुकेशला ऑफ स्टम्पच्या दिशेने फेकण्यास सांगितलं. पण यावेळी धोनी चांगलाच रागात दिसत होता. ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला ज्यानंतर आता या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्सही येत आहेत.


मला फक्त स्टंप टू स्टंप बॉल करायला सांगितलं - मुकेश चौधरी


सामन्यात मुकेशनं सर्वात दमदार कामगिरी केली. त्याने आधी अभिषेक शर्मा मग राहुल त्रिपाठी त्यानंतर शशांक सिंह आणि वॉशिंग्टन सुंदर हे महत्त्वाचे चार विकेट्स घेतले. यावेळी 4 षटकात त्याने 46 धावा दिल्या खऱ्या पण महत्त्वाचे विकेट्स घेतल्याने त्याने सामन्याची दिशा बदलली. दरम्यान धोनी आणि त्याच्यातील या प्रसंगाबद्दल सामन्यानंतर मुकेशला विचारलं असता त्याने धोनी त्यावेळी मला जास्त काही बोलला नसून केवळ बॉल स्टंप टू स्टंप टाक इतकच सांगितलं होतं. 


चेन्नईचा 13 धावांनी विजय


पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium) सुरु असलेल्या आयपीएलच्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं सनरायजर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad Vs Chennai Super Kings) 13 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघानं चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर चेन्नईच्या संघानं 20 षटकात 2 विकेट्स  गमावून 202 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादच्या संघाला 20 षटकात 6 विकेट्स गमावून धावा 189 करता आल्या. 


हे देखील वाचा-