Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru: मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 गडी राखून सहज पराभव केला आहे. आरसीबीने प्रथम खेळताना 196 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला झंझावाती सुरुवात करून दिली. रोहित आणि किशन यांच्यात 101 धावांची उत्कृष्ट आणि स्फोटक भागीदारी झाली. इशान किशनने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याने 34 चेंडूत 69 धावांची खेळी केली. 


धावांचा पाठलाग करताना मुंबईने पहिल्या 6 षटकात 72 धावा केल्या होत्या. दरम्यान, रोहितने 24 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 38 धावा केल्या. सूर्यकुमार यादवही लयीत परतला आहे कारण त्याने केवळ 17 चेंडूत अर्धशतक केले. सूर्यकुमार यादवने आपल्या डावात 52 धावा केल्या आणि डावाच्या शेवटी हार्दिक पांड्यानेही 6 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. मुंबईला शेवटच्या 6 षटकात फक्त 16 धावांची गरज होती. यासह मुंबईने 27 चेंडू शिल्लक असताना 7 गडी राखून सामना जिंकला आहे.


तत्पूर्वी, आरसीबीकडून विराट कोहली (3) व विल जॅक्स (8) हे अपयशी ठरले तरी रजत पाटीदार, कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस व दिनेश कार्तिक यांनी RCB ला मोठी धावसंख्या उभारून दिली. ड्यू प्लेसिस (61) व रजत (50) यांनी 82 धावा जोडून संघाचा डाव सारवला. 38 वर्षीय दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकांत तुफान फटकेबाजी केली. कार्तिकने 23 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 53 धावा करून संघाला 8 बाद 196 धावांपर्यंत पोहोचवले.  


शाब्बास डीके, वर्ल्डकप खेळायचंय!


दिनेश कार्तिकने मुंबईविरुद्ध धमाकेदार फटकेबाजी करत संघाला जवळपास द्विशतकाच्या उंबरठ्यावर आणले. त्याची ही दणादण फटकेबाजी पाहून मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माही खूश झाला. दिनेश कार्तिकच्या आक्रमक फलंदाजीचं कौतुक करताना 'शाब्बास डीके, आता वर्ल्डकप खेळायचंय, असे रोहितने म्हटले. रोहितचे हे शब्द स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाले. रोहितचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 






सूर्यकुमार आणि इशानची तुफान खेळी-


मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात आरसीबीचे गोलंदाज टिकू शकले नाहीत. पॉवरप्ले षटक संपण्यापूर्वीच किशनने पन्नास धावा केल्या होत्या. किशनने 69 धावांच्या खेळीत 7 चौकार आणि 5 षटकार मारले. सूर्यकुमार यादवने विरोधी गोलंदाजांचा चांगलेच धुतले. सूर्यकुमारने 19 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार लगावत 52 धावा केल्या. किशन आणि सूर्यकुमार यांच्या खेळीने मुंबई इंडियन्सचा सामना एकतर्फी झाला होता.