मुंबई : आयपीएलच्या 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सला आता सूर गवसल्याचं चित्र आहे. मुंबई इंडियन्सनं वानखेडे स्टेडियमवर सलग दुसरा विजय मिळवला आहे. हार्दिक पांड्याच्या मुंबईनं आरसीबीवर 7 विकेटनं दणदणीत विजय मिळवला. मुंबईनं ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्या वादळी खेळीच्या जोरावर विजयावर नाव कोरलं. मुंबई आणि बंगळुर यांच्यातील मॅचमध्ये विराट कोहलीनं (Virat Kohli) एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली. विराट कोहलीचं या कृतीबाबत माजी क्रिकेटपटूंनी देखील कौतुक केलं आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मा 38 धावा करुन बाद झाला. बाराव्या ओव्हरमध्ये मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्या बॅटिंगसाठी मैदानात उतरला. हार्दिक पांड्या मैदानात येताच मुंबईच्या प्रेक्षकांनी रोहित रोहित अशा घोषणा दिल्या. मुंबईच्या वानखेडे प्रेक्षक हार्दिक पांड्याला डिवचू लागले होते. मुंबईचे प्रेक्षक हार्दिक पांड्याबाबत शेरेबाजी करत असल्याचं लक्षात येताच विराट कोहलीनं यामध्ये हस्तक्षेप केला. मुंबईच्या प्रेक्षकांनी अशी कृती करु नये असं आवाहन त्यानं केलं. मुंबईच्या प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याला प्रोत्साहन देण्याचं आवाहन विराट कोहलीनं केलं. विराट कोहलीनं हार्दिक पांड्यासाठी ठाम भूमिका घेत तो ग्रेट का आहे हे दाखवून दिलं.
मॅच संपल्यांनतर हार्दिक आणि विराटची भेट
मुंबई इंडियन्सनं मॅच जिंकल्यांनंतर हार्दिक पांड्यानं विराट कोहलीला मिठी मारली. विराट कोहलीनं हार्दिक पांड्याला मिठी मारत दिलासा दिला. विराट कोहलीनं ग्रेट खेळाडू कसे असतात याचं उदाहरण युवा खेळाडूंपुढं ठेवलं आहे. विराट कोहलीनं स्थिती कशीही असली तरी खिलाडूवृत्ती कशी असावी यासंदर्भात आदर्श युवा खेळाडूंपुढं ठेवला आहे. विराट कोहलीचं या कृतीबाबत विरेंद्र सेहवाग, पार्थिव पटेल, आर.पी. सिंग, इरफान पठाण यांनी कौैतुक केलं आहे.
मुंबईचा 7 विकेटनी विजय
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेटवर 196 धावा केल्या. विराट कोहली आज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. विराटनं केवळ 3 धावा केल्या त्याला जसप्रीत बुमराहनं बाद केलं. रजत पाटीदार, फाफ डु प्लेसिस आणि दिनेश कार्तिकनं केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीनं 196 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या मुंबईनं डावाची सुरुवात आक्रमक केली. ईशान किशन आणि रोहित शर्मानं मुंबईला100 धावांची सलामीची भागिदारी करुन दिली. यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवनं 52 धावा केल्या. ईशान किशननं 69 तर रोहित शर्मानं 38 धावा केल्या.
संबंधित बातम्या :