MI vs DC, IPL 2024 : मुंबई इंडियन्स आज पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. वानखेडे मैदानावर मुंबई आणि दिल्ली यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. मुंबई इंडियन्सला सलग तीन पराभवाचा सामना करावा लागलाय. आज मुंबई पहिल्या विजयासाठी मैदानात उतरेल. सूर्यकुमार यादवच्या कमबॅकमुळे मुंबईची फलंदाजी भक्कम झाली आहे. दिल्लीविरोधातील सामन्याआधी मुंबई इंडियन्सच्या नमन धीर यानं प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. यामध्ये त्यानं अनेक विषयावर भाष्य केले. संघातील वातावरण असो अथवा मुंबई कमबॅक कसं करणार? याबाबत नमन धीर यानं सांगितलं.
संघाचं वातावरण कसं आहे, फायनल खेळणार का?
संघातील वातावरण अजूनही चांगले आहे. सर्व खेळाडूंचं बाँडिंग जबरदस्त आहे. आम्ही स्पर्धेतील सर्व सामने गमावले नाहीत, आम्हाला अजून 11 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे पुढील टप्प्यासाठी आम्ही पात्र ठरू अशी आशा वाटते. आम्ही नक्कीच फायनल खेळू, असा विश्वास नमन धीर यानं व्यक्त केला.
पदार्पणावेळी नेमकं काय झालं ?
पदार्पणाच्या सामन्याच्या (गुजरातविरूद्ध) आदल्या दिवशी हार्दिकभाई माझ्याकडे आला अन् मला आज तू खेळणार असल्याचं सांगितलं. कदाचीत मी सराव सामन्यात चांगला खेळल्याने मला टीममध्ये खेळायची संधी मिळाली असेल.
सुरूवातीच्या सामन्यात नमनने शानदार फलंदाजी केली. त्यानं विस्फोटक फलंदाजी करत सर्वांची मनं जिंकली. मुंबई इंडियन्सने नमम धीर याला आघाडीच्या फळीत फलंदाजीची संधी दिली. त्यावेळी त्याला वरिष्ठ खेळाडूंनी काही टिप्स दिल्या. याबाबत तो म्हणाला की, फलंदाजीच्या सल्ल्याबद्दल सांगायचे झाल्यास वरिष्ठांनी मला माझ्या पद्धतीने खेळायला सांगितले. मला कुणालाही काहीही सिद्ध करायची गरज नाही. कोणताही ताण न जाणवता बिंदास्त खेळण्याचा सल्ला दिला.
मुंबई इंडियन्सबद्दल काय म्हणाला ?
आयपीएलमध्ये खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. मुंबई इंडियन्स या सर्वाधिक यशस्वी टीम्सपैकी एकीने मला ही संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. टीमचे वातावरण उत्तम आहे आणि मला त्याची मजा येतेय, असे मत नमनने व्यक्त केले.