IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद (CSK vs SRH) यांच्यामध्ये शुक्रवारी रोमांचक सामना झाला. या सामन्यात हैदराबादने चेन्नईचा सहा विकेटने पराभव केला. या रोमांचक सामन्याचा सर्वांनीच आनंद घेतला. पण चेन्नईच्या एका चाहत्यासाठी हा सामना त्रासदायक ठरला. होय.. सोशल मीडियावर या सामन्यादरम्यानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. चेन्नईच्या एका चाहत्याला चक्क स्टेडियममध्ये सीट मिळाले नसल्याचं यामध्ये दिसतेय. त्या चाहत्यानं 4500 रुपये खर्च करुन सामन्याचं तिकिट खरेदी केले. पण सामना पाहायला गेल्यानंतर त्याचं सीट नव्हतं. याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. चेन्नईच्या चाहत्यासोबत फ्रॉड झाल्याचं एका युजर्सने म्हटलेय. अन्य एका युजर्सच्या मते, ब्लॅकने तिकिटं विक्री करणाऱ्यापेक्षा हा मोठा स्कॅम आहे.
जुनैद अहमद नावाच्या चाहत्यानं सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. त्यानं आपल्याबरोबर घडलेला प्रसंग जसाच्या तसा दिला आहे. जुनैद अहमद यानं चेन्नई आणि हैदराबाद सामन्याचं 4500 रुपयांचं तिकिट खरेदी केले होतं. त्याचा सीट क्रमांक J-66 असा होता. पण तो स्टेडियमवर सीट पाहायला गेला, त्यावेळी सीट मिळालीच नाही. जुनैद याच्या मदतीला स्टेडियमचा कर्मचारी आला. त्यानेही सीट शोधण्याचा प्रयत्न केला. पण J65 सीटनंतर J67 हेच सीट होतं. यावरुन सोशल मीडियात गदारोळ सुरु आहे.
X खात्यावर याबाबत पोस्ट करताना जुनैद अहमद म्हणाला की, "4,500 रुपये खर्च केल्यानंतर चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील पहिला डावाचा खेळ उभं राहून पाहावा लागला." जुनैद यानं स्टेडियम मॅनेजमेंट आणि आयपीएलकडे तिकिटाचे पैसे परत देण्याची मागणीही केली आहे.
जुनैद यानं हैदराबाद आणि चेन्नई सामन्याचा पहिला डावाचा खेळ उभं राहून पाहिला. दुसऱ्या डावादरम्यान जुनैद याला सीट मिळाली. त्याची सीट J69 आणि J70 यादरम्यान मिळाली. रिपोर्ट्सनुसार, स्टेडियममध्ये सीट क्रमांक लावताना चूक कर्मचाऱ्याकडून चूक झाली होती. काही तासानंतर हा गोंधळ मिटला आहे.
चेन्नईचा सहा विकेटने पराभव -
जुनैद अहमद याला सामन्याचा पूर्ण आनंद घेता आला नाही, पण चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील लढत रोमांचक होती. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 165 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना हैदराबादने सुरुवात शानदार केली, पण मधल्या षटकात संघर्ष करावा लागला. पण अखेरीस हैदराबादने सहा विकेटने सामना खिशात घातला.