Indian Premier League 2023 : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये (IPL 2023) फिक्सिंगची बाब (IPL Match Fixing) समोर आली आहे. आयपीएलचा सध्याचा सोळावा हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (Royal Challengers Bangalore) वेगवान गोलंदाजाच्या पैशाचं आमिष देण्यात आलं आहे. आरसीबी (RCB) संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजशी (Mohammed Siraj) संबंधित मॅच फिक्सिंगचं प्रकरण समोर आलं आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, 'एका ड्रायव्हरने फोनद्वारे मोहम्मद सिराजशी संपर्क साधला आणि त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची अंतर्गत माहिती देण्यास सांगितलं.' मोहम्मद सिराजने ही माहिती बीसीसीआयच्या (BCCI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली आहे.


IPL 2023 Match Fixing : आयपीएल 2023 मध्ये फिक्सिंग? 


इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL Match Fixing) पुन्हा एकदा फिक्सिंगचं प्रकरण समोर आलं आहे. आयपीएल बेटिंगमध्ये पैसे गमावल्यानंतर एका ड्रायव्हरने आरसीबीचा गोलंदाज सिराजशी संपर्क साधला आणि त्याच्याकडून संघासंबंधित माहितीची विचारणा केली. फिक्सिंग प्रकरणाबाबत सिराजने बीसीसीआयला माहिती दिली असून या संदर्भात तपास सुरु आहे. बीसीसीआयने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कडक आचारसंहिता बनवली आहे. कोणत्याही खेळाडूने किंवा अधिकाऱ्याने बुकीशी संपर्क साधल्याची माहिती बीसीसीआयला दिली नाही, तर बोर्ड त्याच्यावर कठोर कारवाई करू शकते.






IPL Match Fixing : आरसीबीच्या वेगवान गोलंदाजाला एका ड्रायव्हरकडून पैशांचं आमिष


पीटीआयच्या रिपोर्टनुसार, एका ड्रायव्हरने मोहम्मद सिराजला पैशांचं आमिष दाखवलं. ड्रायव्हरने सिराजला सांगितलं की, जर सिराजने त्याला संघातील आतल्या गोष्टी सांगितल्या तर तो या खेळाडूला मोठी रक्कम देऊ शकतो. मात्र सिराजने संपूर्ण प्रकरणाची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACU) दिली आहे.


मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात ड्रायव्हरला अटक


अधिकाऱ्यांनी सुत्रांना दिलेल्या माहितीनुसार, मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात संबंधित चालकाला अटक करण्यात आली आहे. त्यांनी पुढे माहिती देत सांगितलं की, 'सिराजने माहिती दिल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला अटक केली आहे. आता त्याची चौकशी सुरू आहे. तपासानंतर अधिक माहिती समोर येईल.'


आयपीएलचा सोळावा हंगाम


आयपीएल 2023 ला 31 मार्चपासून सुरुवात झाली आहे. यंदाच्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील सामने 28 मे पर्यंत खेळवले जातील. या टी 20 लीगमध्ये 10 संघांमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंत 25 सामने झाले आहेत. यापूर्वीही टी-20 लीगमध्ये सट्टेबाजीचे आरोप झाले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरने कॅमेरामनला केली शिवीगाळ? मास्टर ब्लास्टर सचिनच्या 'लेका'चा व्हिडीओ व्हायरल