IPL 2022 : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडला यश मिळवून देणारा सलामीवीर जेसन रॉयने आयपीएलच्या पंधराव्या मोसमातून आपलं नाव मागे घेतलं आहे. गुजरात टायटन्सने जेसन रॉयला दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. जेसनने आयपीएलमध्ये सहभागी होणार नसल्याच्या निर्णयाची माहिती गुजरात टायटन्सलाही दिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने याबाबतची माहिती गुजरात संघ व्यवस्थापनाला दिल्याचं कळतं.
जेसन रॉयची माघार ही गुजरात टायटन्ससाठी मोठा धक्का आहे. लवकरच जेसनच्या जागी नव्या खेळाडूला संघात संधी मिळेल.
इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या मोसमाची सुरुवात 26 मार्च रोजी होणार आहे तर अंतिम सामना 29 मे रोजी खेळवण्यात येईल. यंदा आयपीएलमध्ये 10 संघांचा समावेश करण्यात आला असून त्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. गुजरात टायटन्स ग्रुप बीमध्ये असून यात चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद आणि पंजाबचा समावेश आहे.
बायो बबलमुळे माघार
नुकत्याच संपलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) जेसन रॉयने क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचं प्रतिनिधित्त्व केलं होतं. बराच काळ बायो बबलमध्ये राहून येणाऱ्या आव्हानाचा दाखल देत जेसनने आयपीएलमधून माघार घेतली आहे. आयपीएलदरम्यानही बायो बबलमध्ये राहावं लागल्यास त्याला कुटुंबापासून दूर राहावं लागेल. शिवाय दोन महिन्यापूर्वींच त्याच्या दुसऱ्या अपत्याचा जन्म झाला आहे.
2020 मध्येही जेसन रॉयने आयपीएलमध्ये सहभाग घेतला नव्हता. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाने जेसन रॉयला 1.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता.
इंग्लंडच्या सलामीवीर जेसन रॉयने याआधी गुजरात लायन्स (2017), दिल्ली कॅपिटल्स (2018) आणि सनरायझर्स हैदराबाद (2021) संघाचं प्रतिनिधित्त्व केलं होतं. या लीगमध्ये त्याने आतापर्यंत केवळ 13 सामने खेळले असून त्याच्या नावावर 329 धावा जमा आहे. रॉयने आयपीएलमधील पदार्पण 2017 मध्ये गुजरात लायन्स संघातून केलं होतं. त्याचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरोधात खेळला होता. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर स्वत:ला फीट ठेवण्याचा जेसन रॉयचा प्रयत्न आहे.
पीएसएलमध्ये शानदार कामगिरी
पाकिस्तान सुपर लीगमध्येही जेसन रॉयने आपला जलवा दाखवला. क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळताना त्याने सहा सामन्यात 303 धावा केल्या. त्याने सहा डावांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकं लगावली. पहिल्या सामन्यात जेसन रॉयने लाहोर कलंदरविरोधात 116 धावा केल्या होत्या.