RCB vs LSG: आयपीएल 2024 च्या हंगामात काल लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सने 28 धावांनी विजय मिळवला.
लखनौने प्रथम खेळून बंगळुरूला 182 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात आरसीबी अवघ्या 153 धावांत गारद झाला. या मोसमात आरसीबीचा घरच्या मैदानावरील हा तिसरा पराभव आहे. तर लखनौचा या हंगामातील दुसरा विजय आहे. लखनौच्या युवा गोलंदाजांनी आरसीबीला नमवले. यामध्ये वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि फिरकीपटू मणिमारन सिद्धार्थ यांचा समावेश आहे.
मयंक यादवे गेल्याच सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. या पहिल्याच सामन्यात त्याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू टाकत सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर काल बंगळुरुविरुद्ध देखील भेदक गोलंदाजी करत ग्लेन मॅक्सवेल, कॅमरॉन ग्रीन आणि राजत पीटादार यांना बाद केले. मयंक यादवसह मणिमारन सिद्धार्थ याने देखील चांगली गोलंदाजी केली. मणिमारन याने आरसीबीविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि आयपीएलमधील पहिली विकेट विराट कोहलीची घेतली.
मणिमारन सिद्धार्थ कोण आहे?
मणिमारन सिद्धार्थ हा डावखुरा असून ऑफस्पिन गोलंदाजी करतो. मणिमारनला लखनऊने 2024 च्या लिलावात 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मणिमारन सिद्धार्थने त्याच्या टी-20 च्या कारकिर्दीत 7 सामने खेळताना 6.5 च्या अविश्वसनीय गोलंदाजीच्या सरासरीने 18 बळी घेतले आहेत. याशिवाय त्याने आपल्या लिस्ट-ए कारकिर्दीत खेळलेल्या 17 सामन्यांमध्ये 26 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्येही तो तामिळनाडूकडून खेळताना दिसला होता. आतापर्यंतच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्याने 7 सामन्यात 27 बळी घेतले आहेत.
गुणतालिकेत बदल-
आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर लखनौ सुपर जायंट्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. आता केएल राहुलच्या संघाचे 3 सामन्यांत 4 गुण झाले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सची गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सचे 4-4 गुण असले तरी केएल राहुलच्या संघाचा नेट रनरेट चांगला आहे. गुणतालिकेत संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर कायम आहे. राजस्थान रॉयल्सचे 3 सामन्यांत 6 गुण आहेत.