Lanka Premier League :  लंका प्रीमियर लीग स्पर्धेला एक जुलैपासून सुरुवात होणार आहे.  21 जुलै रोजी अखेरचा सामना होणार आहे. एलपीएलचा यंदा पाचवा हंगाम आहे, पण स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच वाद उफाळला आहे.  दांबुला थंडर्स संघाचा मालक तमीम रहमान याला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या आहेत. त्याशिवाय दांबुला थंडर्स संघाला बर्खास्त करण्यात आलेय.  तमीम रहमान हा मूळचा बांगलादेशी असून त्याच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. एलपीएलमधील फिक्सिंग अन् इतर प्रकरणाच्या आरोपासाठी श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने एक स्पेशल पथकाची स्थापना केली आहे. त्यामधील एका पोलीस अधिकाऱ्यानेच याबाबतची माहिती दिली आहे.  


कोलंबोमधील न्यायालयीने तमीम रहमान याला 31 मे पर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर रहमानला बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तमीम याच्या विरोधात अद्याप कोणते आरोपपत्र तयार करण्यात आले की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बेटिंग आणि मॅच फिक्सिंगच्या आरोपांनुसार तमीम रेहमानची चौकशी सुरू आहे. तमीम रहमानच्या अटकेनंतर एलपीएलने दांबुला थंडर्ससोबतचा करार रद्द केल्याचेही वृत्त आहे. दांबुला संघाला बर्खास्त करण्यात आलेय.






दोन भारतीयांवरही कारवाई -


दरम्यान, याआधी श्रीलंकेच्या न्यायालयाने योनी पटेल आणि पी आकाश या दोन भारतीय नागरिकांना पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले होते. कोलंबोतील लिजेंड्स क्रिकेट लीगदरम्यान मॅच फिक्सिंग करताना आढळले होते. .योनी पटेल हे लेजेंड्स लीग क्रिकेटमधील एका संघाचे मालक आहेत. पटेल आणि आकाश सध्या जामिनावर बाहेर आहेत.  त्यांनी 8 मार्च आणि 19 मार्च रोजी झालेल्या मॅचेस फिक्स केल्या होत्या. याबाबतही चौकशी सुरु आहे. 






मथीशा पथिराना सर्वात महागडा खेळाडू - 



लंका प्रीमियर लीग सध्या स्पॉट फिक्सिंगमुळे जगभरात चर्चेत आहे. पण दोन दिवसांपूर्वीच पाचव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावात मथीशा पथिराना सर्वात महगडा खेळाडू ठरला. कोलंबो स्ट्राइकर्सने पथिराना याच्यासाठी 99 लाख 90 हजार रुपये मोजले. मथिराना लंका प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मथीशा पथिराना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य आहे.