Virat Kohli IPL Record : रनमशीन विराट कोहलीने आयपीएलमध्ये आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. अहमदाबाद येथे सुरु असलेल्या एलिमेनटर सामन्यात विराट कोहलीने 33 धावांची छोटेखानी खेळी केली, पण या खेळीतही त्याने नवा विक्रम केला आहे. विराट कोहलीने आठ हजार धावांचा पल्ला पार केला आहे. आयपीएलच्या इतिहासात आठ हजार धावा करणारा विराट कोहली पहिलाच फलंदाज आहे. विराट कोहलीच्या आसपास रोहित, धोनी अथवा धवनही नाहीत. राजस्थानविरोधात विराट कोहलीने 33 धावांची खेळी केली. या छोटेखानी खेळीनंतरही विराट कोहलीने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.  


33 धावांचं योगदान - 


एलिमेटनरच्या सामन्यात विराट कोहलीने 33 धावांचे योगदान दिलं. गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. बोल्टच्या भेदक माऱ्याचा समर्थपणे सामना केल्यानंतर इतर गोलंदाजांचा समाचार घेतला. विराट कोहलीने 24 चेंडूमध्ये 33 धावांचे योगदान दिले.  विराट कोहलीने आपल्या या छोटेखानी खेळीमध्ये एक षटकार आणि तीन चौकार ठोकले. विराट कोहलीने आरसीबीला चांगली सुरुवात करुन दिली. 


आयपीएलमध्ये विराटला तोड नाही - 


आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडलाय. 17 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. 2008 तते 2024 या 17 वर्षांमध्ये विराट कोहलीने 8000 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 252 सामन्यात 8000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये आठ शतके आणि 55 अर्धशतकाचा समावेश आहे. विराट कोहलीने 132 च्या स्ट्राईक रेटने आणि 39 च्या सरासरीने आयपीएलमध्ये धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आयपीएलमध्ये 705 चौकार ठोकले आहेत., तर 272 खणखणीत षटकारही ठोकले आहेत. विराट कोहलीने फिल्डिंगमध्ये 115 झेल घेण्याचा पराक्रमही केला आहे. गोलंदाजीमध्ये विराट कोहलीने चार विकेट घेतल्या आहेत. 


आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज -


आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 8 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शिखर धवन याच्या नावावर 6769 धावा आहेत. रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने 257 सामन्यात 6628 धावा केल्या आहेत. डेविड वॉर्नर 6565 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. मिस्टर आयपीएल सुरेश रैना पाचव्या क्रमांकावर आहे. रैनाने 5528 धावा केल्या आहेत. धोनीच्या नावावर 5243 तर एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर 5162 धावा आहेत. ते अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमामकावर आहे.  गेल, उथप्पा आणि दिनेश कार्तिक अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. गेलच्या नावावर 4965, उथप्पाच्या नावावर 4952 आणि कार्तिकच्या नावावर 4831 धावा आहेत. 


यंदाच्या आयपीएलमध्ये विराटची कामगिरी - 


आयपीएल 2024 मध्ये विराट कोहली वेगळ्याच फॉर्मात आहे. विराट कोहलीने 156 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडलाय. विराट कोहलीने 15 सामन्यात 741 धावां जोडल्या आहेत. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पहिल्या क्रममांकावर विराजमान आहे. ऑरेंज कॅप विराटच्या डोक्यावर आहे. विराट कोहलीने एक शतक आणि पाच अर्धशतकाच्या मदतीने 741 धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीने यंदाच्या हंगामात 38 षटकार आणि 62 चौकार ठोकले आहेत.