Kolkata vs Rajasthan: इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने शारजाह येथे खेळलेल्या IPL 2021 च्या 54 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 86 धावांनी पराभव केला. यासह, केकेआरने प्लेऑफसाठी जोरदार दावा सादर केला आहे. कोलकात्याने पहिल्यांजा खेळत 20 षटकांत चार गडी गमावून 171 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, राजस्थान रॉयल्स संघ 16.1 षटकांत फक्त 85 धावा करू शकला.


वेगवान गोलंदाज शिवम मावी आणि लॉकी फर्ग्युसन हे कोलकाताच्या या विजयाचे नायक होते. मावीने 21 धावांत चार आणि फर्ग्युसनने 18 धावांत तीन विकेट घेतल्या. या विजयासह, केकेआरने प्लेऑफमधील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे.


शुभमन गिलचं अर्धशतक
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला जाताना कोलकाता नाईट रायडर्सची शानदार सुरुवात झाली. वेंकटेश अय्यर आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. अय्यरने 35 चेंडूत 38 धावा केल्या. राहुल तेवतियाने त्याला बोल्ड केले. त्याने आपल्या डावात तीन चौकार आणि दोन षटकार मारले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या नितीश राणाने पाच चेंडूंत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 12 धावा केल्या. तो षटकार मारण्याच्या प्रयत्नात ग्लेन फिलिप्सच्या सीमारेषेवर झेलबाद झाला.


यानंतर, केकेआरची तिसरी विकेट 16 व्या षटकात पडली. शुभमन गिल 44 चेंडूत 56 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या डावात चार चौकार आणि दोन षटकार मारले. तर राहुल त्रिपाठीने 14 चेंडूत 21 धावा केल्या. त्रिपाठीने आपल्या डावात तीन चौकार लगावले. शेवटी दिनेश कार्तिक 11 चेंडूत 14 धावांवर नाबाद राहिला आणि कर्णधार इऑन मॉर्गनने 11 चेंडूत 13 धावा केल्या. कार्तिकने एक षटकार मारला, त्यानंतर मॉर्गनने एक चौकार आणि एक षटकार ठोकला.