IPL 2022 Marathi News : वानखेडे मैदानावर मुंबई आणि चेन्नई यांच्यात सामना सुरु आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने आज प्लेईंग 11 मधून बर्थडे बॉय कायरन पोलार्डला वगळलेय. यंदाच्या हंगामात पोलार्डला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. मुंबईचा संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे, पण बेंच स्ट्रेंथ पाहाण्यासाठी मुंबई प्रयोग करत आहे. अशात मुंबईने आज पोलार्डच्या जागी ट्रिस्टन स्टब्स याला संधी दिली आहे. कायरन पोलार्डच्या जागी खेळवलेला हा ट्रिस्टन स्टब्स नेमका आहे तरी कोण? जाणून घेऊयात... 


अर्ध्या आयपीएलमध्ये संधी - 
टायमल मिल्स दुखापतीमुळे आयपीएलबाहेर गेल्यानंतर मुंबईने दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्स याला उर्वरित सामन्यासाठी करारबद्ध केले. 21 वर्षीय ट्रिस्टन स्टब्स याने नुकताच दक्षिण आफ्रिका ए संघात पदार्पण केले आहे. तो मधल्या फळीमध्ये विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातोय. सध्या मुंबईच्या संघाला अशाच फलंदाजाची गरज आहे. त्यामुळे मुंबईने पोलार्डच्या जागी स्टब्सला संधी दिली.  




20 लाखांमध्ये केले खरेदी -
स्टब्सने आतापर्यंत 17 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये 157.14 च्या स्ट्राईक रेटने 506 धावा चोपल्या आहेत. 20 लाख रुपयांच्या किंमतीमध्ये मुंबईने स्टब्सला खरेदी केले आहे. आठ फर्स्ट क्लास सामन्यात स्टब्सने 46. 50 च्या सरासरीने एकूण 465 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. लिस्ट ए च्या 11 सामन्यात एका अर्धशतकाच्या मदतीने  275 धावांचा पाऊस पाडलाय.  


कोण आहे स्टब्स?
ट्रिस्टन स्टब्स दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू आहे. 21 वर्षीय स्टब्स विकेटकिपर फलंदाज आहे. विस्फोटक खेळी करण्यासाठी स्टब्सला ओळखले जाते. स्थानिक क्रिकेटमध्ये स्टब्सने विक्रमी फलंदाजी केली. स्टब्सने नुकत्याच झालेल्या सीएसए चॅलेंज टूर्नामेंटमध्ये वॉरियर्सकडून खेळताना 183.12 च्या स्ट्राइक रेटने धावांचा पाऊस पाडलाय.