kavya maran : आयपीएलच्या 18 व्या हंगमात सध्या खेळपट्टी आणि स्टेडियमवरुन वादाला तोंड फुटलंय. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि ईडन गार्डन्समधील खेळपट्टीचे क्युरेटर सुजन मुखर्जी यांच्यात वाद झालेला पाहायला मिळाला होता. दरम्यान, आता काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद या संघाचा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशी वाद सुरु झालाय. हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन  आणि सनरायझर्सच्या संघामध्ये तिकिटाच्या मुद्द्यावरुन वाद पाहायला मिळतोय. दरम्यान, या प्रकरणी आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन विरोधात चौकशीचे आदेश

सनरायझर्स हैदराबाद संघाने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनवर तिकिटांवरुन ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता. या आरोपांना गांभीर्याने घेत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हैद्राबाद क्रिकेट असोशिएशन विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दक्षता प्रमुख कोथाकोटा श्रीनिवास यांना या प्रकरणाचे सत्य जाणून घेण्यास सांगितले आहे.

मोफत तिकीट मिळवण्यासाठी काव्या मारनच्या संघाला ब्लॅकमेलिंग 

रिपोर्ट्सनुसार, हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनमधील लोक या प्रकरणात दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा आदेश मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिलाय. मोफत तिकीट मागितल्यामुळे सनरायजर्स हैद्राबादचा संघ संतापला होता.  त्यामुळे एसआरएच मालकीण काव्या मारन फोम ग्राऊंड देखील बदलण्याचा विचार करत होती. पॅट कमिन्सचा नेतृत्वात खेळत असलेल्या सनरायजर्सच्या संघाने सध्या मागील दोन्ही सामने गमावले आहेत.

काव्या मारनचा संघ असलेल्या सनरायझर्स हैदराबादला एका अधिकाऱ्याने मेल पाठवला होता. या मेलमध्ये नमूद करण्यात आले होते की, 'मी सनरायजर्स हैद्राबादसोबत सुरू असलेल्या घडामोडी आणि तुम्हाला करण्यात येणाऱ्या ब्लॅकमेलिंगबाबत चिंता व्यक्त करतो. हा मुद्दा वारंवार समोर येत आहे आणि मला वाटते की, बीसीसीआय आणि आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

सनरायजर्स हैद्राबाद संघाच्या अधिकाऱ्याने लिहिले की, 'आम्हाला फ्रँचायझीने हैद्रबाद क्रिकेट असोसिएशनने जारी केलेल्या मोफत तिकिटांच्या मुद्द्यावरही स्पष्टीकरण हवे आहे. HCA अध्यक्ष जगन मोहन राव आणि सचिव हे सनरायझर्स हैदराबाद व्यवस्थापनाला सतत धमकावत आहेत.  जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत ते हैदराबादमध्ये आयपीएल आयोजित करू देणार नाहीत, असं सांगत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

कुणाल कामराचा शो पाहाण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना समन्स बजावले, मुंबई पोलिसांचा प्रताप