IPL 2022 BookMyShow : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं समोर आल्यानंतर ठाकरे सरकारने राज्यातील करोना निर्बंध हटवले. त्यातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमधील प्रेक्षकांची उपस्थितीतीही वाढवण्यात आली आहे. याआधी मैदानात 25 टक्के प्रेक्षकांना सामना पाहता येत होता. आता ही मर्यादा 50 टक्के इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलप्रेमींचा आनंद द्विगुणित होणार आहे.
'बुक माय शो' या कंपनीकडे आयपीएलच्या सामन्याचे तिकीट विक्रीचे हक्क अधिकृतपणे देण्यात आलेले आहेत. बुक माय शोवर आयपीएलची तिकिटंही उपलब्ध आहेत. बुक माय शोककडून टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, सहा एप्रिलपासून आयपीएलच्या सामने होणाऱ्या मैदानातील प्रेक्षकांच्या उपस्थितीचा नियम बदलला आहे. प्रेक्षकांची उपस्थिती 25 टक्केंवरुन 50 टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे सहा एप्रिलपासून आयपीएलच्या सामन्यांना चाहत्यांसाठी जास्त तिकिटे उपलब्ध असणार आहेत.
कोरोना महामारीच्या पार्शभूमीवर आयपीएलचे साखळी सामने मुंबई आणि पुणे येथे खेळवले जात आहे. वानखेडे, ब्रेबॉर्न, डी.वाय.पाटील आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानात आयपीएलचे सामने सुरु आहेत. प्रक्षेकांच्या उपस्थितीचे नियम बदलल्यामुळे आता स्टेडियमध्ये गर्दी होऊ शकते आणि चाहत्यांना या सामन्यांचा आनंद घेता येऊ शकतो. दरम्यान , महाराष्ट्रातील करोनाचे नियम शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आाल असावा, असे आता म्हटले जात आहे. पण याबाबत महाराष्ट्र सरकारने किंवा बीसीसीआयने अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही.
आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रातच!
आयपीएलच्या आगामी पंधराव्या मोसमासाठी बीसीसीआय सज्ज झालंय. येत्या 26 मार्च ते 29 मे या कालावधीत आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचं आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या मोसमातल्या 74 पैकी 70 साखळी सामन्यांचं आयोजन मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात करण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये यंदा दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं यंदाच्या मोसमापासून आठऐवजी दहा संघ खेळणार आहेत. या दहा संघांची 'अ' आणि 'ब' अशा गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ आपल्या गटातल्या संघांसोबत एकेक सामना आणि दुसऱ्या गटातल्या संघांसोबत प्रत्येकी दोन सामन्यांमध्ये खेळणार आहे. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. त्यामुळं संघांची संख्या वाढली असली तरी सामन्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न दिसून येत आहे.