IPL 2025 KKR vs RCB Ajinkya Rahane कोलकाता : आयपीएलच्या 18 व्या हंगामाची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं विजयानं सुरुवात केली. तर, गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला पहिल्याच सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे यानं संघाचं नेमकं काय चुकलं, मॅच टीमच्या हातून कधी निसटली यासंदर्भातील माहिती मॅच संपल्यानंतर दिली. अजिंक्य रहाणे म्हणाला आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत चांगल्या स्थितीत होतो. मात्र, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग आणि आंद्रे रसेलच्या विकेट गेल्या आणि आम्ही दबावात आलो, असं अजिंक्य रहाणे म्हणाला. केकेआरच्या एका वेळी 210 होतील असं वाटत असताना केवळ 174 धावा झाल्या.
पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कार्यक्रमात अजिंक्य रहाणे म्हणाला "मला वाटतं आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत चांगला खेळ करत होतो, मात्र2-3 विकेट गेल्यानं आमची लय बिघडली. त्यानंतर गोलंदाजांनी त्यांच्या बाजूनं पूर्ण प्रयत्न केले. मात्र, ते यशस्वी झाले नाहीत. जेव्हा व्यंकटेश अय्यर फलंदाजी करत होता तेव्हा आम्ही 200-210 धावा केल्या जाऊ शकतात, अशी चर्चा करत होतो. मात्र त्या विकेटनं आमची लय मोडली."
अजिंक्य रहाणे यानं पुढं म्हटलं की थोडं दव होतं, मात्र आरसीबीनं पॉवरप्लेमध्ये चांगली फलंदाजी केली. आम्ही 200 पेक्षा अधिक धावसंख्येची अपेक्षा करत होतो. आम्ही या कामगिरीबाबत अधिक विचार करणार नाही. मात्र, काही गोष्टींवर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करु. एकावेळी कोलकाताची टीम 200 पार जाईल असं दिसत होतं, मात्र 175 धावा देखील झाल्या नाहीत.
कोलकातानं 12 ओव्हरमध्ये 125 धावा केल्या होत्या. मात्र, पुढच्या 8 ओव्हर्समध्ये त्यांनी 49 धावा केल्या. व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल हे लवकर बाद झाले. अंगकृष रघुवंशी देखील मोठी खेळी करु शकला नाही. केकेआरच्या मॅनेजमेंटनं फलंदाजीसाठी इम्पॅक्ट प्लेअर नियम न वापरता गोलंदाजीसाठी वापरण्याचा निर्णय घेतलेला. मात्र, त्यांना अपेक्षित फायदा मिळवता आला नाही.
आरसीबीचा दणदणीत विजय
गतविजेत्या केकेआरला पराभूत करत आरसीबीनं विजयानं सुरुवात केली. आरसीबीनं आयपीएलच्या 18 व्या हंगामातील पहिल्या मॅचमध्ये केकेआरला 7 विकेटनं पराभूत केलं. केकेआरनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 174 धावा केल्या होत्या. आरसीबीनं हे आव्हान 16.2 ओव्हरमध्ये 177 करत पार केलं. या विजयानं आरसीबीनं गेल्या तीन वर्षांचा हिशोब पूर्ण केला. कारण, गेल्या तीन आयपीएलमध्ये आरसीबीला केकेआर विरुद्ध विजय मिळवता आला नव्हता. विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांच्या अर्धशतकानं केकेआरचा त्यांच्याच होम ग्राऊंडवर बँड वाजवण्यात आरसीबीला यश आलं.