IPL 2025 Playoff Schedule जयपूर : आयपीएलच्या 18 व्या हंगामातील लीग स्टेजमधील शेवटची मॅच आहे. प्लेऑफमध्ये पोहोचलेली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील लखनौ सुपर जायंटस यांच्यात सामना होणार आहे. आरसीबीनं प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून त्यांना आजच्या सामन्यात विजय मिळवून क्वालिफायर 1 खेळण्याची संधी आहे. दुसरीकडे रिषभ पंतची लखनौ सुपर जायंटस जरी प्लेऑफमधून बाहेर गेलं असलं तरी त्यांचा प्रयत्न यंदाचं अभियान विजयानं समाप्त करण्याचा असेल.पंजाब किंग्जनं मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानं त्यांनी क्वालिफायर 1 मधील स्थान निश्चित केलं आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सल एलिमिनेटर खेळणार हे स्पष्ट झालेलं आहे. आता फक्त पंजाब आणि मुंबई विरुद्ध आरसीबी आणि गुजरात यांच्यापैकी कोण लढणार हे स्पष्ट होणं बाकी आहे.
गुणतालिका पाहिली असता पंजाब किंग्ज 19 अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. 18 गुणांसह गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघाचे 14 सामने पूर्ण झाले आहेत. आरसीबी 17 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे तर मुंबई 16 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीचा एक सामना शिल्लक असून लखनौला त्यांनी पराभूत केल्यास आयपीएल प्लेऑफ आणि फायनलचं समीकरण बदलू शकतं.
...तर गुजरात-मुंबईच्या अडचणी वाढणार
प्लेऑफमध्ये प्रवेश केलेल्या चार संघांपैकी केवळ आरसीबीची एक मॅच शिल्लक आहे. बंगळुरुनं लखनौला मोठ्या फरकानं पराभूत केलं तर ते गुणतालिकेत चांगल्या नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर पोहोचू शकतात. अशावेळी त्यांची क्वालिफायर 1 मध्ये पंजाब विरुद्ध लढत होईल. जर, बंगळुरु आणि पंजाब यांच्यात पहिली क्वालिफायर झाल्यास गुजरात आणि मुंबईच्या अडचणी वाढू शकतात.
आरसीबीनं जर पहिल्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला तर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एलिमिनेटरमध्ये मॅच होईल. यामध्ये गुजरात किंवा मुंबईला क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश मिळेल. एलिमिनेटर मॅच जिंकलेल्या संघाला क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघासोबत एलिमिनेटर मधील विजेत्या संघाला खेळावं लागेल. म्हणजेच एलिमिनेटर खेळणाऱ्या संघाला 2 सामन्यात विजय मिळवावा लागेल, तर ते अंतिम फेरीत प्रवेश करावा लागेल.
दरम्यान, मुंबई इंडियन्सला एलिमिनेटरचे सामने खेळावे लागणार हे स्पष्ट आहे. मात्र, गुजरात टायटन्सची अपेक्षा लखनौनं विजय मिळवावा अशी असेल, जर लखनौ जिंकलं तर आरसीबीला एलिमिनेटरचा सामना खेळावा लागेल. तर, गुजरात आणि पंजाब यांच्यात क्वालिफायर 1 ची मॅच होऊ शकते. आयपीएलची फायनल 3 जूनला होणार आहे.