PBKS vs DC IPL 2025 Update: भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचे उर्वरित 17 सामने 17 मेपासून पुन्हा खेळविण्यात येतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबतचे नवे वेळापत्रक जाहीर केले असून, प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचे स्थळ अद्याप जाहीर केलेले नाहीत. यंदाचा अंतिम सामना 3 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.
आयपीएलची स्पर्धा स्थगित करण्याआधी धर्मशाला येथे पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना खेळवण्यात येत होता. पंजाब आणि दिल्लीचा हा सामना 10.1 षटकानंतर थांबवण्यात आला. या सामन्यात पंजाब प्रथम फलंदाजी करत होते आणि सामना थांबवला तेव्हा त्यांचा स्कोअर 10.1 षटकांत 122 धावा होता. जर पंजाबने हा सामना जिंकला असता तर तो प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करणारा पहिला संघ बनला असता. आता जेव्हा बीसीसीआयने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे, तेव्हा श्रेयस अय्यर आणि पंजाबच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्स यावर्षी शानदार कामगिरी करत आहेत. पंजाबने संघाने 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी 7 जिंकले आणि 3 गमावले, तर 1 सामना अनिर्णीत राहिला. पंजाब 15 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स देखील प्लेऑफच्या शर्यतीत आहे.
पंजाब आणि दिल्लीचा सामना पुन्हा नव्याने खेळवला जाणार-
पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना जिथे थांबवला होता तिथूनच पुन्हा सुरू होईल, असं चाहत्यांना अंदाज होता. बीसीसीआयने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे, त्यात हा सामना देखील समाविष्ट आहे. हा सामना पहिल्या चेंडूपासून सुरू होईल, म्हणजेच दिल्ली आणि पंजाबचा सामना पुन्हा खेळवला जाईल.
पंजाब विरुद्ध दिल्ली सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना शनिवार, 24 मे रोजी खेळला जाईल. हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.
अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाणार-
आयपीएल 2025 चे उर्वरित सामने 17 मे पासून सुरू होत आहेत, पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात बंगळुरूमध्ये खेळवला जाईल. लीग टप्प्यातील 13 सामने 6 ठिकाणी होतील आणि त्यामध्ये 2 डबल हेडर सामने असतील. प्लेऑफ सामन्यांची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. परंतु सामन्याचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.