IPL 2025 MI vs CSK Suryakumar Yadav Ruturaj Gaikwad चेन्नई : आयपीएलची केकेआर आणि आरसीबी यांच्यातील मॅचनं धडाक्यात सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेली मुंबई इंडियन्स पुन्हा सज्ज झाली आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज देखील ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वात दुसऱ्या हंगामाची सुरुवात करण्यासाठी तयार आहे. आज आयपीएलच्या चाहत्यांसाठी सुपर संडे आहे. कारण, राजस्थान रॉयल्स आणि सन रायजर्स हैदराबाद यांच्यात दुपारी मॅच होणार आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. चेन्नई आणि मुंबई च्या मॅचची आयपीएलच्या चाहत्यांना प्रतीक्षा असते. दोन्ही संघाचे चाहते या सामन्याच्या निमित्तानं आपापल्या भावना व्यक्त करत असतात. मॅचला एक दिवस बाकी असताना मुंबई इंडियन्सनं एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओचं कॅप्शन देताना मुंबई इंडियन्सनं सूर्या बदलणार नाही, असं कॅप्शन दिलं आहे.
ऋतुराज गायकवाड येताना दिसताच...
चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड आपल्याकडे येतोय हे दिसताच सूर्यकुमार यादवनं मुंबई इंडियन्सशी संबंधित असलेली एक नोट किंवा कार्ड आपल्या खिशात ठेवण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा ते खिशात जात नसल्यानं सूर्यकुमार यादवनं पुन्हा ते व्यवस्थित ठेवलं. तोपर्यंत ऋतुराज गायकवाड त्याच्या जवळ पोहोचला होता. यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सनं त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.
मुंबई चेन्नई आमनेसामने
मुबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकलं आहे. आज आयपीएलचे दोन सामने पार पडणार आहेत. यामध्ये दुपारी साडे तीन वाजता राजस्थान रॉयल्स विरुद्ध सन रायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होईल. त्यानंतर सायंकाळी साडे सात वाजता चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडिनय्स यांच्यात लढत होईल.
सूर्यकुमार यादवकडे संघाचं नेतृत्व
गेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी गोलंदाजी करताना स्लो ओव्हर रेटच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं कॅप्टन हार्दिक पांड्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यामुळं चेन्नई विरूद्धच्या सामन्यात संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे.
दरम्यान, मुंबई आणि चेन्नई यांच्यातील लढत चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई आणि मुंबई यांच्यापैकी कोणता संघ 2025 च्या आयपीएलची विजयानं सुरुवात करतो ते पाहावं लागेल. चेन्नई घरच्या मैदानावर कशी कामगिरी करते याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. याशिवाय महेंद्रसिंह धोनी देखील क्रिकेट चाहत्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल.