नवी दिल्ली : आयपीएलचा 18 वा हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी आतापर्यंत यशस्वी ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी 18 व्या हंगामात अनेक गोष्टी बदलल्या. गेल्या आयपीएलमध्ये संघाचं नेतृत्त्व करणारा रिषभ पंत संघासोबत नाही. यावेळी संघाचे नेतृत्त्व अक्षर पटेल करतोय. टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू केएल राहुल यावेळी दिल्लीकडू खेळतोय. केएल राहुल यानं कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिल्यानं अक्षर पटेलवर मोठी जबाबदारी येऊन पडली. या जबाबदारीला अक्षर पटेलनं न्याय दिला असल्याचं पाहायला मिळतंय. दिल्ली कॅपिटल्सनं चार सामने जिंकले आहेत. यामध्ये त्यांनी लखनौ सुपर जायंट्स, सनरायजर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केलं. आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आमने सामने येणार आहेत. 

दिल्लीचं मजबूत समीकरण

दिल्ली कॅपिटल्सनं या हंगामात पहिल्यांदा कर्णधार बदलला. अक्षर पटेलच्या नेतृत्त्वात संघामध्ये उत्साह पाहायला मिळतोय. अक्षर पटेल शांत आणि संयमी दिसत असला तरी त्याची रणनीती आक्रमक पाहायला मिळते. दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये देखील बदल झाले. टीमचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट वेणुगोपाल राव बनले तर प्रशिक्षक हेमांग बदानी झाला आहे. गोलंदाजी प्रशिक्षक मुनाफ पटेल आहे तर मेंटर केविन पीटरसन आहे. 

आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात दिल्ली अनुक्रमे सहाव्या आणि नवव्या स्थानावर राहिली होती. त्यामुळं दिल्लीनं संघात अनेक बदल केले. दिल्लीनं अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल यांना रिटेन केलं. ऑक्शनमध्ये आशुतोष शर्मा आणि विपराज निगम यांना संघात घेतलं. त्यानंतर केएल राहुलला देखील संघासोबत घेतलं. मिशेल स्टार्कसारखा आक्रमक आणि अनुभवी गोलंदाज मिळाल्यानं दिल्लीच्या गोलंदाजीला धार आली. केएल राहुल 14 कोटी आणि मिशेल स्टार्क 11 कोटी  रुपयांमध्ये संघासोबत आले. तर फाफ डु प्लेसिस सारखा अनुभवी फलंदाज देखील या संघाकडे आहे. 

मुंबई दिल्लीचा विजयरथ रोखणार? 

दिल्ली कॅपिटल्सनं आतापर्यंत लखनौ, चेन्नई, बंगळुरु आणि हैदराबाद या बड्या संघांना पराभवाचं पाणी पाजलं आहे. आता त्यांचा सामना मुंबई इंडियन्स सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध आहे. मुंबई इंडियन्सकडे अनेक स्टार खेळाडू आहेत त्यामध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा या सर्वांना दिल्लीचा  बालेकिल्ला सर करण्यात यश मिळणार का हे पाहावं लागेल. मुंबईला केवळ एका सामन्यात विजय मिळाला आहे.