IPL 2025: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan War) यांच्यातील तणावादरम्यान 9 मे रोजी बीसीसीआयने आयपीएल (IPL) स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. काल (10 मे) भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीची घोषणा झाली त्यानंतर आयपीएल आता पुन्हा सुरु होणार आहे. आयपीएल पुन्हा सुरु करण्यावर आज निर्णय अपेक्षित आहे. बीसीसीआयची आज बैठक देखील आहे. बीसीसीआय केंद्र सरकारसह, फ्रँचायजी,ब्रॉडकास्टर्स,स्पॉन्सर्स आणि राज्य क्रिकेट संघांसोबत चर्चा करणार आहे. मात्र आयपीएलमध्ये विविध संघाकडून खेळणारे अनेक परदेशी खेळाडू आपापल्या देशात परतले आहेत. त्यामुळे आयपीएलच्या संघ मालकांनी त्यांना पुन्हा भारतात येण्यास सांगितले आहे.
सर्व आयपीएल संघांसमोर एक मोठे आव्हान-
आयपीएल लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, भारत सरकारच्या परवानगीने पुढील आठवड्यात १५ मे च्या सुमारास आयपीएल पुन्हा सुरू होऊ शकते. अशा परिस्थितीत, सर्व दहा फ्रँचायझी परदेशी खेळाडू आणि कोचिंग स्टाफला भारतात परत बोलावण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर, ८ मे रोजी, जम्मू आणि पठाणकोटमध्ये हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर, धर्मशाळेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्यभागी थांबवण्यात आला आणि नंतर लीगमधून निलंबित करण्यात आला. त्यानंतर बहुतेक परदेशी खेळाडू शुक्रवार आणि शनिवार दरम्यान भारत सोडून गेले. अशा परिस्थितीत, आता सर्व संघांनी त्यांच्या परदेशी खेळाडूंना भारतात परतण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.
आयपीएलच्या 2025 च्या हंगामातील एकूण 16 सामने शिल्लक-
आयपीएलमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. 22 मार्चपासून सुरु झालेल्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे रोजी कोलकात्यातली ईडन गार्डन्स मैदानावर खेळवण्याचं नियोजित होतं. मात्र आता या सर्व स्पर्धेवर टांगती तलवार आहे. दरम्यान, आयपीएलच्या 2025 च्या हंगामातील एकूण 16 सामने शिल्लक आहेत. तिकडे पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यांनी पाकच्या क्रिकेट लीगवरही परिणाम झाला आहे. पाकिस्तानच्या रावळपिंडी मैदानावर ड्रोन हल्ला झाला होता. त्यामुळे PSL चे सामने रद्द केले होते.
संबंधित बातमी:
IPL 2025 Suspension मोठी बातमी: आयपीएलची स्पर्धा स्थगित; बीसीसीआयने जाहीर केला निर्णय