मुंबई : टीम इंडियाचा विकेटकीपर आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कॅप्टन रिषभ पंतनं (Rishabh Pant) आज 454 दिवसांनंतर कमबॅक केलं आहे. रिषभ पंतनं मैदानात प्रवेश केला तो क्षण त्याच्या चाहत्यांसह भारतीय क्रिकेट रसिकांसाठी आनंदाचा ठरला होता. रिषभ पंत ज्यावेळी बॅटिंगसाठी मैदानात उतरला त्यावेळी मोहालीतील प्रेक्षकांनी स्टँडिंग ओवेशन देत त्याचं स्वागत केलं. रिषभ पंतसाठी टीम इंडियाचा खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) ट्विट केलं आहे.
सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
सूर्यकुमार यादवनं रिषभ पंतसाठी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिषभचा बटिंगसाठी ग्राऊंडवर आल्यानंतरचा व्हिडीओ सूर्यकमारनं पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सूर्यकुमारनं रिषभ पंतसाठी खास मेसेज लिहिला आहे. आपण सर्वजण आतापर्यंत या क्षणाची वाट पाहत होतो. प्रेरणादायी मूव्हीज खूप पाहिल्या पण या रिअल लाइफ कथेला तोड नाही, असं सूर्यकुमार यादवनं म्हटलं आहे. सूर्यकुमार यादवच्या एक्स प्लॅटफॉर्मवर नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड 29 धावा करुन बाद झाल्यानंतर रिषभ पंतनं बॅटिंगसाठी मैदानावर एंट्री केली. यावेळी मैदानातील प्रेक्षकांनी त्याचं उभं राहून स्वागत केलं. सूर्यकुमार यादवनं त्या क्षणाची व्हिडीओ क्लीप शेअर केली आहे. सूर्यकुमारनं त्या क्लीपसोबत रिषभ पंतसाठी काही ओळी लिहिल्या आहेत.
रिषभ पंत आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारेल, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. मात्र, रिषभनं 13 बॉलमध्ये 18 धावा केल्या.रिषभ पंत बॅटिंगद्वारे कमाल करु शकला नाही. मात्र, विकेटकीपींग करताना रिषभनं त्याचा जलवा कायम असल्याचं दाखवून दिलं. रिषभनं जितेश शर्माला विकेटकीपींगद्वारे आऊट केलं.
रिषभचं कमबॅक मात्र दिल्ली पराभूत
आयपीएलच्या 17 व्या पर्वाची सुरुवात विजयानं करण्याचा दिल्लीचा प्रयत्न फसला. दिल्लीला पंजाब किंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्जनं प्रथम टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगला आमंत्रित केलं होतं. दिल्लीची सुरुवात अडखळत झाली होती. दिल्लीचा संघ 150 धावा करु शकेल की नाही अशी शक्यता असताना अभिषेक पोरेल याच्या फटकेबाजीमुळं दिल्लीनं 9 बाद 174 धावा केल्या.मात्र,पंजाबनं सॅम करन आणि लिविंगस्टन याच्या बॅटिंगच्या जोरावर 4 विकेटनं दिल्लीवर विजय मिळवला.
सूर्यकुमार यादव गुजरात विरुद्धच्या लढतीला मुकला
मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज अशी सूर्यकुमार यादवची ओळख आहे. सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना जखमी झाला होता. गेल्या तीन महिन्यांपासून सूर्यकुमार यादव क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएलमध्ये तरी सूर्यकुमार यादव क्रिकेट खेळताना पाहायाला मिळेल अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, नॅशनल क्रिकेट अकादमीकडून सूर्यकुमार यादव फिट असल्याचं प्रमाणपत्र न मिळाल्यानं मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील पहिल्या लढतीतून त्याला बाहेर बसावं लागलं आहे.
संबंधित बातम्या :
KKR vs SRH : केकेआरच्या टॉप ऑर्डरनं हैदराबादसमोर नांगी टाकली,श्रेयस अय्यर ते नितीश राणा स्वस्तात बाद
PBKS vs DC : पंजाबच्या ओपनर्सची आक्रमक सुरुवात, इशांत शर्मानं कसा लावला ब्रेक,जाणून घ्या