मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) सलग तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का आणि आयसीसीच्या टी-20 रॅकिंगमधील पहिल्या स्थानावर असणारा बॅटसमन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फिट झाला आहे, अशी माहिती आहे. सूर्यकुमार यादव आता दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात खेळताना दिसेल.


अखेर सूर्याचं कमबॅक?


सूर्यकुमार यादवकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या टी-20 टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सूर्यकुमार यादव त्या मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता. डिसेंबर जानेवारीपासून सूर्यकुमार यादव क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या काही दिवसांपासून नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये सूर्यकुमार यादव दुखापतीतून बरा होण्यासाठी प्रयत्न करत होता. आता सूर्यकुमार यादव फिट असल्याचं वृत्त एक्स्प्रेस स्पोर्टसकडून देण्यात आलं आहे. आता सूर्यकुमार यादव फिट झाल्यानं मुंबईला देखील दिलासा मिळाला असून मुंबईच्या आगामी मॅचमध्ये  सूर्यकुमार यादव संघात असू शकतो. 


दिल्लीविरुद्ध मैदानात उतरणार?


मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये विजय मिळवता आलेला नाही. गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स  यांच्या विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता. तिन्ही मॅचमध्ये मुंबईच्या टीमला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. आता मुंबईचा हुकमी एक्का असलेला सूर्यकुमार यादव फिट झाला असून दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव कमबॅक करण्याची शक्यता आहे. 


हार्दिक पांड्याला दिलासा


मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याचं देखील सूर्यकुमार यादवच्या कमबॅकमुळं टेन्शन मिटणार आहे. सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सकडून चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर बॅटिंग करतो. तो संघात नसल्यानं हार्दिक पांड्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यावं लागत होतं. ती समस्या आता दूर होऊ शकते. मुंबईला गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमध्ये 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. सूर्यकुमार यादव संघात परतल्यानं हार्दिक पांड्याला दिलासा मिळणार आहे. 


मुंबई पहिला विजय मिळवणार?


मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आता सूर्यकुमार यादवसारखा मिस्टर 360 अशी ओळख असलेला हुकमी एक्का संघात परतल्यानं मुंबई दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये पहिला विजय मिळवणार का हे पाहावं लागेल. 


संबंधित बातम्या : 


Mayank Yadav LSG: राजनाधी एक्सप्रेस...फक्त दोन सामने खेळला अन् मयंक यादवने स्वत:चाच विक्रम मोडला!


ट्रोलिंग, अपमान, डिवचलं....; मुंबईच्या सलग 3 पराभवानंतर हार्दिकने अखेर मौन सोडलं, काय म्हणाला?