चेन्नई :श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्त्वात कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knigt Riders) आयपीएलचं (IPL) तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवलं.  केकेआरनं  सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. केकेआरनं हैदराबादवर 8 विकेटनं दणदणीत विजय मिळवला. श्रेयस अय्यरनं यंदा केकेआरच्या आयपीएल ट्रॉफी विजयाचा 10 वर्षांचा दुष्काळ संपवला. गेल्या वर्षी  दुखापतीमुळं आयपीएल खेळू न शकलेल्या श्रेयस अय्यरनं केकेआरला विजेतेपद मिळवून दिल्यानं क्रिकेट विश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. आयपीएल ट्रॉफीतील विजयानंतर केकेआरच्या खेळाडूंनी चेपॉकवर जोरदार जल्लोष केला. यावेळी श्रेयस अय्यरच्या कृतीनं त्याचं वेगळेपण दिसून आलं. श्रेयस अय्यरनं केकेआरच्या चीअरलीडर्सची भेट घेत त्यांना धन्यवाद दिले. 


श्रेयसचं का होतंय कौतुक?


कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवल्यानंतर खेळाडूंनी मैदानावर जल्लोष केला. यावेळी श्रेयस अय्यरनं चेन्नईच्या मैदानात जमलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या चाहत्यांचे आभार मानले. श्रेयस अय्यरनं यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या चीअर लीडर्सचे आभार मानले. श्रेयस अय्यरच्या या कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. 


पाहा व्हिडीओ






कोलकाता नाईट रायडर्सनं 2012 आणि 2014 मध्ये आयपीएलचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यावेळी केकेआरचा कॅप्टन गौतम गंभीर होता. यंदाच्या आयपीएलमध्ये गौतम गंभीर केकेआरचा मेंटॉर आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली श्रेयस अय्यरनं केकेआरला तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवून दिलं आहे.  


श्रेयस अय्यरकडून आयपीएलची ट्रॉफी रिंकू सिंगकडे


केकेआरचा महत्त्वाचा खेळाडू असलेल्या रिंकू सिंगसाठी यंदाचं आयपीएल निराशाजनक ठरलं. रिंकू सिंगचं यामुळं टी-20 वर्ल्ड कपच्या 15 जणांच्या संघातील स्थान देखील हुकलं. आपल्या संघातील फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूचं मनोबल कसं वाढवायचं हे श्रेयस अय्यरनं रिंकू सिंगच्या हाती आयपीएलची ट्रॉफी देत दाखवून दिलं. रिंकू सिंगनं 2023 चं आयपीएल दमदार फलंदाजीसह गाजवलं होतं. यंदा मात्र त्याला सूर गवसला नाही. 


श्रेयसचं कमबॅक आणि केकेआरला विजेतेपद


कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचं नेतृत्त्व श्रेयस अय्यरकडे 2022 पासून आहे. गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये दुखापतीमुळं श्रेयस अय्यर स्पर्धेबाहेर होता. त्यावेळी नितीश राणानं केकेआरचं नेतृत्त्व केलं होतं. यंदा श्रेयस अय्यरनं कॅप्टन म्हणून कमबॅक केलं.  श्रेयस अय्यरनं केकेआरच्या संघातील सर्व खेळाडूंच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर विजेतेपद मिळवून दिलं. क्वालिफायर-1 आणि फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत केकेआरनं आयपीएल ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरलं. 


संबंधित बातम्या: 


Shreyas Iyer : केकेआरला आयपीएलचं विजेतेपद , आता श्रेयस अय्यर शुभमन गिल अगोदर टीम इंडियाचा कॅप्टन होणार, माजी खेळाडूचा दावा


IPL 2024 : रायडूची विराट कोहलीवर टीका, पीटरसनने उडवली खिल्ली, म्हणाला जोकर