RCB vs SRH, IPL 2024 : ट्रेविस हेडचं वादळी शतक, हेनरिक क्लासेनच्या झंझावती अर्धशतकाच्या बळावर हैदराबादनं आरसीबीविरोधात 20 षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात 287 धावांचा डोंगर उभारला. हैदराबादनं यंदाच्या हंगामात आपलाच विक्रम मोडीत काढला. मुंबईविरोधात हैदराबादनं 276 धावांचा डोंगर उभारला होता. आज हा विक्रम मोडीत निघालाय. हैदराबादकडून सलामी फलंदाज ट्रेविस हेड यानं 102 धावांची झंझावती खेळी केली. तर हेनरिक क्लासेन यानं  67 धावांची वादळी खेळी केली. आरसीबीकडून एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. प्रत्येक गोलंदाजानं खराब गोलंदाजी केली. आरसीबीला विजयासाठी तब्बल 288 धावांचं आव्हान मिळालं आहे. 


हैदराबादच्या फलंदाजांनी 20 षटकांमध्ये 22 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. लॉकी फर्गुसन आमि रीस टॉप्ली यांना सर्वाधिक चोपण्यात आले. फर्गुसनच्या चार षटकात सहा चौकार तर टोप्लीच्या चार षटकात 5 षटकार ठोकण्यात आले. आरसीबीच्या प्रत्येक गोलंदाजांच्या षटकात षटकार लगावण्यात हैदराबादच्या फलंदाजांना यश आले.  हैदराबादच्या फलंदाजांनी 19 चौकारही लगावले. 







ट्रेविस हेडचं वादळी शतक - 


ट्रेविस हेड यानं आयपीएलमधील पहिलं शतक ठोकलं. बंगळुरुच्या मैदानावर हेड यानं आरसीबीच्या गोलंदाजांचा खऱपूस समाचार घेतला. हेड यानं 41 चेंडूमध्ये झंझावती 102 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये हेड यानं 8 षटकार आणि 9 चौकारांचा पाऊस पाडला. हेड यानं पहिल्या चेंडूपासूनच आरसीबीच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माच्या झंझावाती फलंदाजीमुळे हैदराबादनं 6 षटकात 76 धावांचा पाऊस पाडला होता.  हेड बाद झाल्यानंतरही हैदराबादची धावगती मंदावली नाही. 





हेनरिक क्लासेनची क्लास खेळी - 


हेड बाद झाल्यानंतर हेनरिक क्लासेन यानं डावाची सुत्रे हातात घेतली. त्यानं चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. क्लासेनच्या फटकेबाजीमुळे हैदराबादची धावसंख्या 200 पार पोहचली. क्लासेन यानं 31 चेंडूमध्ये 67 धावांची झंझावती खेळी केली. क्लासेन यानं चौफेर फटकेबाजी करत हैदराबादची धावसंख्या वाढवली. 


जोरदार फिनिशिंग - 


हेनरिक क्लासेन बाद झाल्यानंतर अब्दुल समद आणि एडन मार्करम यांनी शानदार फिनिशिंग केले. हेनरिक क्लासेन आणि समद यांनी 19 चेंडूमध्ये नाबाद 56 धावांची भागिदारी केली. अब्दुल समद यानं 10 चेंडूमध्ये तीन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 37 धावांची खेळी केली. तर एडन मार्करम यानं 17 चेंडूमध्ये दोन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीनं नाबाद 32 धावांची खेळी केली. अभिषेक शर्मानं सलामीला 22 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी केली.