RCB vs CSK Weather Report : गुजरात आणि कोलकाता यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता 18 मे रोजी आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील होणारा सामनाही पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. आरसीबी आणि चेन्नईसाठी (RCB vs CSK) हा सामना अतिशय निर्णायक आहे, दोन्ही संघाला विजय अनिवार्य आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हे दोन्ही संघ भिडणार आहेत. पण 18 मे रोजी बंगळुरुमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज (Weather Report) वर्तवण्यात आला आहे. सामन्यावेळी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पावसामुळे सामना रद्द झाला तर आरसीबीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. 


सामन्यावेळी पावसाची शक्यता किती ?


चेन्नई आणि आरसीबी यांच्यात होणारा सामना 18 मे रोजी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उस्तुकता आहे. पण पावसामुळे सर्वांच्या उत्साहावर पाणी फेरलं जाणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सामन्याच्या दिवशी 72 टक्के पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. 18 तारखेला बंगळुरुमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 
 
आरसीबीला बसणार मोठा धक्का ?


मुसळधार पावसामुळे आरसीबीला मोठा धक्का बसू शकतो. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर चेन्नई आणि आरसीबीला प्रत्येकी एक एक गुण दिला जाईल. आशा स्थितीमध्ये आरसीबीचे 13 आणि चेन्नईचे 15 गुण होतील. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी फक्त एक सामना जरी जिंकला तरी त्यांचे 14 गुण होतील. आशा स्थितीमध्ये आरसीबी स्पर्धेतून गाशा गुंडाळेल.  






आरसीबीचं प्लेऑफचं समीकरण  Royal Challengers Bengaluru Playoffs Scenario


आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये जोरदार कमबॅक केले. लागोपाठ पाच सामन्यात विजय मिळवत आरसीबीने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.  आरसीबीचे 13 सामन्यात 12 गुण झाले आहेत, ते सध्या पाचव्या क्रमांकावर विराजमान आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला चेन्नईविरोधात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागेल. 


चेन्नईचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे आरसीबीला मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. जर प्रथम फलंदाजी केली तर आरसीबीला 18 धावांनी सामना जिंकावा लागेल. धावांचा पाठलाग करताना आरसीबीला 18.1 षटकात आव्हान पार करावे लागेल. हैदराबाद आणि लखनौच्या सामन्यावरही आरसीबीचं प्लेऑफचं गणित अवलंबून आहे. 


आणखी वाचा :


3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण