IPL 2024 Playoffs Scenario : आयपीएल स्पर्धा उत्तरार्धाकडे झुकल्यानंतर प्लेऑफचं समीकरण हळूहळू स्पष्ट होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) प्लेऑफमधील स्थान निश्चित केलेय. कोलकाता नाईट रायडर्स पहिल्या दोन स्थानावरच कायम राहणार असल्याचं आकड्यावरुन स्पष्ट दिसतेय. तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. प्लेऑफच्या तीन जागा रिक्त आहेत, त्यासाठी सहा संघामध्ये चुरस लागली आहे. यामध्ये राजस्थान रॉयल्स याचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित मानले जातेय. पण उर्वरित दोन जागांसाठी पाच संघामध्ये मोठी स्पर्धा असेल. पाहूयात कोणत्या संघाकडे प्लेऑफची काय संधी, प्लेऑफचं समीकरण, कुणाविरोधात सामने शिल्लक? 


राजस्थान रॉयल्स Rajasthan Royals Playoffs Scenario


संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सने पहिल्या टप्प्यात शानदार कामगिरी केली. पण मागील तीन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफमधील स्थान निश्चित मानले जातेय. राजस्थानच्या संघाकडे सध्या 12 सामन्यात 16 गुण आहेत. त्यांचा रनरेटही शानदार आहे. त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. दोन्ही सामने राजस्थानने गमावले, तरीही ते प्लेऑफमध्ये पोहचू शकतात. त्याशिवाय त्यांना टॉप 2 मध्ये पोहचण्यासाठी एका सामन्यात विजय मिळवावा लागेल. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये 15 मे रोजी सामना होणार आहे. तर कोलकाता नाइट रायडर्सविरोधात 19 मे रोजी आमनासामना होणार आहे. राजस्थानचे दोन्ही सामने घरच्या मैदानावर आहेत. त्यांच्यासाठी ही जमेची बाजू असेल.
 
चेन्नई सुपर किंग्स Chennai Super Kings Playoffs Scenario


गतविजेता चेन्नई सुपर किंग्सचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने 13 सामन्यात सात विजय मिळवले आहेत. चेन्नईच्या नावावर सध्या 14 गुण आहेत. त्यांचा अखेरचा सामना आरसीबीविरोधात होणार आहे. प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना हा विजय गरजेचा आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर समिकरणे बदलू शकतात. पण आरसीबीपेक्षा चेन्नईचा रनरेट चांगलाय. त्यामुळे फक्त सामना जिंकणं गरजेचं आहे. त्याशिवाय हैदराबाद आणि लखनौ यांना पराभवाचा सामनाही करावा लागेल. जर हैदराबाद आणि लखनौने दोन्ही सामने गमावले तर आरसीबी आणि चेन्नई दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. 


सनरायजर्स हैदराबाद SunRisers Hyderabad Playoffs Scenario


पॅट कमिन्सचा सनरायजर्स हैदराबाद संघ प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहे. हैदराबादचे सध्या 12 सामन्यात 14 गुण आहेत. त्याशिवाय रनरेटही त्यांचा चांगला आहे. हैदराबादला दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय अनिवार्य आहे. हैदराबादने दोन्ही सामने जिंकले तर ते टॉप 2 मध्ये पोहचतील. पण त्यांना एक सामना जिंकता आला तर ते प्लेऑफमध्ये पोहचतील. पण दोन्ही सामन्यात पराभव झाल्यास नेटरनरेटनर गणित ठरवले जाईल. 


हैदराबादचे उर्वरित दोन्ही सामने तळाच्या संघासोबत आहेत. 16 मे रोजी गुजरात टायटन्स तर 19 मे रोजी पंजाब किंग्सविरोधात होणार आहे. हे दोन्ही सामने घरच्या मैदानावर होणार आहेत, ही हैदराबादसाठी जमेची बाजू आहे. हैदराबादला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी एक सामना जिंकावा लागेल. दोन्ही जिंकले तर टॉप 2 मध्ये पोहचतील. पण हैदराबदाचा दोन्ही सामन्यात पराभव झाल्यास चेन्नई, आरसीबी अथवा लखनौच्या कामगिरीवर त्यांना अवलंबून राहावे लागेल. 


आरसीबी  Royal Challengers Bengaluru Playoffs Scenario


आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये जोरदार कमबॅक केले. लागोपाठ पाच सामन्यात विजय मिळवत आरसीबीने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.  आरसीबीचे 13 सामन्यात 12 गुण झाले आहेत, ते सध्या पाचव्या क्रमांकावर विराजमान आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला चेन्नईविरोधात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागेल. 


चेन्नईचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे आरसीबीला मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. जर प्रथम फलंदाजी केली तर आरसीबीला 18 धावांनी सामना जिंकावा लागेल. धावांचा पाठलाग करताना आरसीबीला 18.1 षटकात आव्हान पार करावे लागेल. हैदराबाद आणि लखनौच्या सामन्यावरही आरसीबीचं प्लेऑफचं गणित अवलंबून आहे. 


दिल्ली कॅपिटल्स Delhi Capitals Playoffs Scenario


दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी अखेरच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. दिल्लीचे 13 सामन्यात 12 गुण आहेत, त्यांचा रनरेटही अतिशय खराब आहे. त्यामुळे अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागेल. दिल्ली कॅपिटल्सचा अखेरचा सामना लखनौविरोधात होणार आहे.


लखनौ सुपर जायंट्स Lucknow Super Giants Playoffs Scenario


केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्स संघ प्लेऑफच्या शर्यतीत जिवंत आहे. लखनौकडे 12 सामन्यात 12 गुण आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी लखनौला उर्वरित दोन्ही सामन्यात विजय गरजेचा आहे. रनरेट खराब असल्यामुळे एक सामना गमावला तर आव्हान संपुष्टात येऊ शकते. 


लखनौचे उर्वरित दोन सामने दिल्ली आणि मुंबईविरोधात होणार आहे. दिल्लीविरोधात 14 मे आणि मुंबईविरोधात 17 मे रोजी होणार आहे. या दोन्ही सामन्यात विजय लखनौसाठी अनिवार्य आहेत. लखनौचा रनरेट -0.769 अतिशय खराब आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी दोन्ही सामने जिंकावाचे लागतील.