IPL 2024: Rajasthan Royals vs Mumbai Indians: राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) मुंबई इंडियन्सविरुद्ध 60 चेंडूत नाबाद 104 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 7 षटकार मारले. यशस्वी जैस्वालच्या शानदार शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा सहज पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 18.4 षटकांत 1 गडी गमावून लक्ष्य गाठले. अशाप्रकारे संजू सॅमसनच्या संघाने आयपीएलच्या या हंगामातील सातवा विजय ठरला. या विजयासह राजस्थानने प्ले ऑफमधील स्थान जवळपास निश्चित केलं आहे.
IPL 2024: जैस्वालची रोहितला मिठी-
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, यशस्वी जैस्वालच्या शतकानंतर मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) जैस्वालला मिठी मारली. यावेळी दोन्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावर हसू होते. रोहित शर्माने यशस्वी जैस्वालला मिठी मारून शुभेच्छा दिल्या.
राजस्थानचं प्ले ऑफमधील स्थान जवळपास निश्चित-
मुंबई इंडियन्सचा पराभव करून राजस्थान रॉयल्सने पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान मजबूत केले आहे. आता राजस्थान रॉयल्सचे 8 सामन्यांत 14 गुण झाले आहेत. त्याच वेळी, दुसऱ्या स्थानावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये 4 गुणांचे अंतर आहे. मात्र, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. आता मुंबई इंडियन्सचे 8 सामन्यांत 6 गुण झाले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे.
इतर संघाची काय स्थिती?
कोलकाता नाइट रायडर्स 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाताने 7 सामन्यात 5 सामने जिंकले आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद देखील 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईचा संघाने 7 सामन्यात 4 विजय मिळवत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. लखनौचा संघ 8 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. लखनौने 7 सामन्यात 4 विजय मिळवले आहेत. गुजरातचा संघ 8 गुणांसह सहाव्या क्रमांकावर, दिल्लीचा संघ 4 गुणांसह आठव्या स्थानावर असून पंजाब 4 गुणांसह नवव्या, तर बंगळुरुचा संघ 2 गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.
संबंधित बातम्या:
राजस्थान अव्वल स्थानी कायम, मुंबई सातव्या क्रमांकावर; जाणून घ्या, आयपीएलचे Latest Points Table
'मला अजिबात आवडत नाही...'; सामना गमावल्यानंतरही चेहऱ्यावर स्मितहास्य कायम, हार्दिक काय म्हणाला?