Mumbai Indians Hardik Pandya and Rohit Sharma : मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indians) उभी फूट पडली आहे. संघ दोन गटात विभागला गेल्याचं निरीक्षण ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क यानं नोंदवलं आहे. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलताना मायकल क्लार्कनं मन की बात बोलून टाकली. क्लार्कच्या मते, मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी व्यक्तीगत प्रतिभापेक्षा संघ एकजूट होऊन खेळणं महत्वाचं असते. संपूर्ण संघ कसा कामगिरी करतो, त्यावर यश अवलंबून असतं. सध्या मुंबई इंडियन्सचा संघात उभी फूट पडली आहे. त्यामुळे खेळाडूंना एकजूट होऊन खेळता येत नाही, त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झालाय.


मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्यांचा पाच वेळचा चॅम्पियन कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) हटवून आयपीएलच्या चालू हंगामात हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढल्यामुळे काही खेळाडू निराश आहेत. मुंबई इंडियन्सला क्वालिफाय करण्यासाठी उर्वरित सर्व सामन्यात विजय अनिवार्य झालाय. मायकल क्लार्कनं स्टार स्पोर्ट्स क्रिकेट लाईव्ह कार्यक्रमात मुंबईच्या कामगिरीवर स्पष्टपणे भाष्य केले. तो म्हणाला की, "मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र होईल की नाही, माहीत नाही. आपण जे पाहतोय, त्यापेक्षा मुंबईच्या ताफ्यात बरेच काही चालले आहे.  एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू संघात असतानाही कामगिरीत सातत्य दिसत नाही. " 


मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये वेगवेगळे गट पडले आहेत. कोणताही प्लॅन काम करत नाही.  एकजूट होत नाहीत, संघाला एकसंध होऊन खेळता येत नाही, असे मायकल क्लार्क म्हणाला. दरम्यान, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, टिम डेविड आणि जसप्रीत बुमराह यासारखे मॅच विनर खेळाडू असतानाही मुंबईच्या संघाला विजय मिळवता आला नाही. मुंबई इंडियन्सला नऊ सामन्यात फक्त तीन विजय मिळवता आले आहेत. सहा गुणांसह मुंबईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सने तीन सामन्यात विजय मिळवला, त्याचं श्रेय जसप्रीत बुमराह आणि रोपरियो शेफर्ड यांच्या कामगिरीवर आहे. 


मायकल क्लार्क म्हणाला की, व्यक्तिगत प्रतिभा विजय मिळवून देऊ शकते. रोहित शर्माने आणखी एक शतक ठोकलं. हार्दिक पांड्याने धावा काढल्या. बुरमहाने भेदक मारा केला, तर उर्वरित सामन्यात काहीही होऊ शकतं. मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी एकसंघ म्हणून खेळण्याची गरज आहे. फक्त व्यक्तीगत प्रदर्शनापेक्षा एकजूट होऊन खेळणं महत्वाचं आहे. पुढील सामन्यात मुंबईच्या ताफ्यात बदल होईल, अशी अपेक्षा आहे.