IPL 2024 Jake Fraser-McGurk: दिल्ली कॅपिटल्सने काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 10 धावांनी पराभव केला. दिल्लीच्या या विजयात जेक फ्रेझर मॅकगर्कचा (Jake Fraser-McGurk) मोठा वाटा होता, ज्याने अवघ्या 27 चेंडूत 84 धावांची खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. सामना जिंकल्यानंतर मॅकगर्कला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्याने केलेल्या एका विधानाची चर्चा सध्या रंगली आहे.
मुंबईविरुद्धच्या सामन्याच्या एकदिवसाआधी मी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा व्हिडीओ पाहत असल्याचं मॅकगर्कने सांगितले. जेक फ्रेझर मॅकगर्क म्हणाला, "मी खूप घाबरलो होतो. मी दिवसभर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे व्हिडीओ पाहत होतो. पण सामन्यात सगळे उलटे होते आणि तुम्हाला फक्त चेंडूवर लक्ष केंद्रित करावे लागते. जगातील सर्वोत्तम गोलंदाजाविरुद्ध खेळणे चांगले वाटते. हा एक उत्तम अनुभव आहे."
बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार
जसप्रीत बुमराहने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या डावात त्याने दुसरे षटक टाकले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेक फ्रेझर मॅकगर्कने गगनचुंबी षटकार मारून बुमराहसह प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून मॅकगर्कचा बुमराहला आक्रमक फलंदाजी करण्याचा इरादा होता असे वाटू लागले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून दिल्ली कॅपिटल्सने बुमराहच्या षटकात 18 धावा केल्या. आयपीएल 2024 मध्ये बुमराहने टाकलेले हे सर्वात महागडे षटक ठरलं.
मॅकगर्कचे 15 चेंडूंत अर्धशतक
मॅकगर्कने आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतकाच्या आपल्याच विक्रमाची बरोबरी करताना 15 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मॅकगर्कने चौफेर फटकेबाजी करत वेगाने धावा केल्या. यामध्ये त्याने 11 चौकार आणि 7 षटकार टोलावले.
तिलक आणि हार्दिकच्या तुफानी खेळीनंतरही मुंबईचा पराभव-
मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने 32 चेंडूत सर्वाधिक 63 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार मारले. हार्दिक पांड्याने 24 चेंडूत 46 धावांची तुफानी खेळी केली. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय टीम डेव्हिडने 17 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. इशान किशन 14 चेंडूत 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर रोहित शर्माने 8 धावा केल्या. 13 चेंडूत 26 धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवला खलील अहमदने बाद केले.
संबंधित बातम्या:
रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर Video