IPL 2024 DC vs MI: जेक फ्रेझर मॅकगर्क याने अवघ्या 27 चेंडूंत केलेली 84 धावांची आक्रमक खेळी आणि गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी झगडणाऱ्या मुंबई इंडियन्सला 10 धावांनी पराभूत करत शानदार विजय नोंदवला. या विजयासह दिल्लीने प्ले ऑफसाठी दावा कायम ठेवला आहे. मुंबई आणि दिल्ली यांच्यात सामना सुरु असताना अरुण जेटली मैदानावर एक अनोखी घटना घडली.
रोहित शर्मा फलंदाजी करत असताना मैदानावर पतंग आली. लिझाद विल्यम्स दिल्लीसाठी पहिले षटक टाकायला आला. याच षटकात एक पतंग कुठूनतरी उडून मैदानात आली. रोहितने ती विकेटकिपिंग करत असलेल्या ऋषभ पंतच्या हातात दिली. यानंतर पंत ती पतंग भर मैदानात उडवण्याचा प्रयत्न केला. हे पाताच अंपायर धावून आले आणि त्यांनी पंतच्या हातातली पतंग घेतली. या घटनेवर मैदानात उपस्थित लोकांनीही जोरदार गोंधळ घातला. वास्तविक ही घटना मुंबई इंडियन्सच्या डावातील पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूनंतर घडली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ-
तिलक आणि हार्दिकच्या तुफानी खेळीनंतरही मुंबईचा पराभव-
मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने 32 चेंडूत सर्वाधिक 63 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार मारले. हार्दिक पांड्याने 24 चेंडूत 46 धावांची तुफानी खेळी केली. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय टीम डेव्हिडने 17 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. इशान किशन 14 चेंडूत 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर रोहित शर्माने 8 चेंडूत 8 धावा केल्यानंतर खेळ सुरू ठेवला. 13 चेंडूत 26 धावा करून सूर्यकुमार यादवला खलील अहमदने बाद केले.
गुणतालिकेत मुंबईची घसरण-
गुणतालिकेत राजस्थानचा संघ अव्वल स्थानी कायम आहे. राजस्थानने 9 सामन्यात 8 विजय मिळवले आहे. तर एका सामन्यात पराभव झाला आहे. राजस्थानचे सध्या 16 गुण आहे. लखनौविरुद्धच्या विजयानंतर राजस्थानने प्ले ऑफ फेरीमधील आपेल स्थान निश्चित केले आहे. कोलकाता नाइट रायडर्स 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाताने 8 सामन्यात 5 विजय मिळवले आहेत. तर हैदराबाद संघ 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौ 10 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
मुंबईविरुद्धच्या विजयानंतर दिल्लीने गुणतालिकेत झेप घेतली आहे. दिल्लीचा संघ 10 गुणांसह पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. चेन्नईने एकूण 8 सामने खेळले आहेत. त्यात 4 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभव झाला आहे. चेन्नईचे 8 गुण आहेत. गुजरातचा संघ सातव्या क्रमांकावर असून त्यांचे 8 गुण आहेत. तर पंजाबचा संघ 6 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. पंजाबने 9 सामन्यात 3 विजय मिळवले आहेत. तर 6 सामन्यात पंजाबला पराभवाचा सामना करायला लागला आहे. मुंबईचा संघ नवव्या क्रमांकावर असून बंगळुरुचा संघ 4 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.