कोलकाता : येथील ईडन गार्डन्स मैदानावर यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2024) 31 वी मॅच कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Rideres) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात पार पडली. राजस्थानचा खेळाडू जोस बटलरनं (Jos Butler) 60 बॉलमध्ये 107 धावांची खेळी करत संघाला अशक्यप्राय असा विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्स या मॅचमध्ये विजय मिळवू शकणार नाही अशी स्थिती असताना जोस बटलरनं राजस्थानला एकहाती विजय मिळवून दिला. या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) यानं जोस बटलरचं अभिनंदन केलं आणि त्याला मिठी मारली.
राजस्थान रॉयल्सनं पहिल्यांदा टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाताचा ओपनर सुनील नरेननं झळकावलेल्या शतकाच्या जोरावर त्यांनी 6 विकेटवर 223 धावा केल्या होत्या. सुनीलन नरेननं 56 बॉलमध्ये 109 धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सला या धवसंख्येचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सच्या बॉलर्सनी नियमित अंतरानं धक्के दिले. 13 व्या ओव्हरमध्ये राजस्थानची स्थिती 6 बाद 121 अशी झाली होती. मात्र, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेल्या जोस बटलरनं एकहाती मॅच फिरवली. जोस बटलरनं राजस्थानला अखेरच्या बॉलवर विजय मिळवून दिला. बटलरनं नऊ चौकार आणि सहा सिक्सच्या जोरावर मॅच एकहाती फिरवली. राजस्थाननं या विजयासह आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम देखील रचला.
जोस बटलरनं राजस्थानला विजय मिळवून दिल्यानंतर शाहरुख खाननं त्याचं टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनपूर्वी शाहरुख खान यानं स्वत: जोस बटलरकडे जाऊन त्याचं अभिनंदन करत त्याला मिठी मारली. शाहरुख खाननं बटलरला मारलेल्या मिठीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. राजस्थान रॉयल्सच्या विजयात रोव्हमन पॉवेलच्या 13 बॉलमधील 26 धावांची खेळी देखील महत्त्वाची ठरली. पॉवेल आणि बटलर या दोघांनी 57 धावांची भागिदारी केली.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सला एकहाती विजय मिळवून देणाऱ्या जोस बटलर याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. राजस्थान रॉयल्सनं सहाव्या विजयासह गुणतालिकेत पहिलं स्थान कायम राखलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघानं यंदाच्या आयपीएलमध्ये सात मॅच खेळल्या असून त्यांना सहा मॅचमध्ये विजय मिळवता आलेला आहे. तर, गुजरात टायटन्सकडून त्यांचा पराभव झाला होता. सहा मॅचमधील विजयानंतर 12 गुणांसह ते गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स सहा पैकी चार मॅचमधील विजयासह दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना दोन वेळा पराभव स्वीकारावा लागलेला आहे.
संबंधित बातम्या :
जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट