कोलकाता : संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या नेतृत्त्वातील राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) आयपीएलच्या (IPL 2024) 31 व्या मॅचमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) दोन विकेटनी पराभव केला. ईडन्स गार्डन्सवर झालेल्या मॅचमध्ये दोन्ही संघांकडून चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला.कोलकाता नाईट रायडर्सनं सुनील नरेनच्या शतकाच्या जोरावर 6 बाद 223 धावा केल्या. या धावांचा पाठलाग राजस्थाननं यशस्वीरित्या केल्या. राजस्थाननं दोन विकेट राखून विजय मिळवला. जोस बटलरनं (Jos Butler) केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थाननं विजयावर नाव कोरलं. मॅचनंतर बोलताना कॅप्टन संजू सॅमसन यानं विजयाचा आत्मविश्वास कुणामुळं बोलताना जोस बटलर ऐवजी दुसऱ्या खेळाडूचं नाव घेतलं.
पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमनं सुनील नरेनच्या शतकी खेळीच्या जोरावर धावांचा डोंगर उभा केला. संजू सॅमसननं राजस्थानच्या सर्व बॉलर्सचा वापर केला मात्र नरेनला रोखण्यात त्यांना अपयश आलं. नरेननं 56 बॉलमध्ये 109 धावांची खेळी केली. याच्या जोरावर केकेआरनं 6 बाद 223 धावा केल्या.
केकेआरनं दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि कॅप्टन संजू सॅमसन चांगली खेळी करु शकले नाहीत. एका बाजूनं नियमित अंतरानं राजस्थानचे फलंदाज बाद होत असताना जोस बटलरनं मैदानावर तळ ठोकला. त्यानं नऊ चौकार आणि सहा सिक्सच्या जोरावर विजय मिळवला. जोस बटलरनं 60 बॉलमध्ये 107 धावांची खेळी केली.
राजस्थाननं अखेरच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकली. कॅप्टन संजू सॅमसन यानं मॅचविषयी बोलताना म्हटलं की आम्ही मॅच जिंकू शकतो असा आत्मविश्वास आम्हाला रोव्हमन पॉवेलच्या वादळी खेळीच्या वेळी मिळाला. रोव्हमन पॉवेल यानं 13 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली. त्यामध्ये त्यानं तीन सिक्स आणि एक चोकार मारला."विजयानंतर आनंद झाला असून आम्ही विकेट गमावत असल्यानं पराभव होईल असं वाटत असताना रोव्हमन पॉवेल यानं ज्या प्रकारे सिक्स मारले ते पाहिल्यावर विजय मिळवू" असं वाटल्याचं संजू सॅमसन यानं म्हटलं.
संजू सॅमसननं कोलकाता नाईट रायडर्सच्या बॉलर्सचं कौतुक देखील केलं. यानंतर संजू सॅमसन यानं जोस बटलरवर कौतुकाचा वर्षाव केला. जोस राजस्थानच्या टीमसाठी 6 ते 7 वर्षांपासून खेळत असून त्यामुळं आनंदी आहे. योग्यवेळी त्यानं धावा केल्या. तो सलामीवीर असेल आणि योग्यवेळी फॉर्ममध्ये आल्यास कोणतीही धावसंख्या यशस्वीपणे गाठता येईल. तो काहीतरी विशेष करतो, असं संजू सॅमसन म्हणाला.
संबंधित बातम्या :
जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!