IPL 2024 Hardik Pandya Mumbai Indians vs Delhi Capitals: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनंतर आता आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सचा प्रवास जवळपास संपला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत नेहमीच अव्वल स्थानावर असणारी मुंबई 10 संघांच्या लीगमध्ये 9व्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 10 धावांनी पराभव झाला.
मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने 32 चेंडूत सर्वाधिक 63 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार मारले. हार्दिक पांड्याने 24 चेंडूत 46 धावांची तुफानी खेळी केली. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय टीम डेव्हिडने 17 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. या सामन्यानंतर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) विधानाची चर्चा रंगली आहे.
पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या काय म्हणाला? (Hardik Pandya Statment After Match)
हा खेळ अधिकाधिक चुरशीचा अन् अटीतटीचा होत चालला आहे. अशा सामन्यांमुळे गोलंदाजांवर प्रचंड दडपण येत आहे, त्यामुळे आम्ही ते करण्यास स्वत:ला पाठबळ दिले. आम्हाला आमच्या विजयाची खात्री होती, असं हार्दिक म्हणाला.
कोणाला जबाबदार धरले?
हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, मधल्या षटकांत आम्ही काही जोखीम पत्करायला हव्या होत्या. अक्षर पटेलविरुद्ध विशेष म्हणजे डावखुऱ्या फलंदाजांनी फटकेबाजी करायला हवी होती. गेम अव्हेरनेसच्या दृष्टीने हे आम्हाला जमले नाही. जॅक फ्रेझर-मॅकगर्कने जोखीत पत्करून फलंदाजी केली आणि तो मैदानात खरोखरच चांगला खेळला हे खूपच आश्चर्यकारक होते. त्यातून तरुणाईची निर्भयता दिसून येते.
गुणतालिकेत मुंबईची घसरण-
गुणतालिकेत राजस्थानचा संघ अव्वल स्थानी कायम आहे. राजस्थानने 9 सामन्यात 8 विजय मिळवले आहे. तर एका सामन्यात पराभव झाला आहे. राजस्थानचे सध्या 16 गुण आहे. लखनौविरुद्धच्या विजयानंतर राजस्थानने प्ले ऑफ फेरीमधील आपेल स्थान निश्चित केले आहे. कोलकाता नाइट रायडर्स 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाताने 8 सामन्यात 5 विजय मिळवले आहेत. तर हैदराबाद संघ 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौ 10 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईविरुद्धच्या विजयानंतर दिल्लीने गुणतालिकेत झेप घेतली आहे. दिल्लीचा संघ 10 गुणांसह पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. चेन्नईने एकूण 8 सामने खेळले आहेत. त्यात 4 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभव झाला आहे. चेन्नईचे 8 गुण आहेत. गुजरातचा संघ सातव्या क्रमांकावर असून त्यांचे 8 गुण आहेत. तर पंजाबचा संघ 6 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. पंजाबने 9 सामन्यात 3 विजय मिळवले आहेत. तर 6 सामन्यात पंजाबला पराभवाचा सामना करायला लागला आहे. मुंबईचा संघ नवव्या क्रमांकावर असून बंगळुरुचा संघ 4 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
मुंबई प्ले ऑफ फेरीत कशी पोहचेल?
मुंबई इंडियन्स सध्या 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला त्यांचे सर्व उर्वरित 5 सामने जिंकावे लागतील, ज्यामुळे त्यांचे टॉप-4 मध्ये स्थान निश्चित होईल. पुढील 5 सामन्यांमध्ये 4 विजय मुंबईला प्लेऑफमध्ये नेऊ शकतात, परंतु अशावेळी त्यांना इतर सामन्यांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल. पुढील 5 सामन्यांमध्ये मुंबईचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्सशी प्रत्येकी दोन वेळा होईल.
संबंधित बातम्या:
बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर VideoI