IPL 2024, RCB vs CSK : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला फक्त 48 तास शिल्लक राहिले आहेत. शुक्रवारी आरसीबी आणि चेन्नई (CSK vs RCB) यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. चेपॉक स्टेडियमवर हे दोन्ही संघ यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2024) पहिला सामना खेळणार आहेत. सीएसके गतविजेता आहे, तर आरसीबीला आतापर्यंत एकदाही चषक उंचावता आला नाही. दोन्ही संघातील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. चेन्नई आणि आरसीबी (CSK vs RCB) यांच्यातील ताकद आणि कमकुवत बाजू जाणून घेऊयात...


चेन्नईची  ताकद काय ?  CSK Strengths: 


अष्टपैलू खेळाडूंचा भरणा हीच चेन्नईची सर्वात मोठी ताकद आहे. चेपॉकवरील संथ खेळपट्टीवर चेन्नईकडे विविधता असणारे गोलंदाज आहेत. रविंद्र जाडेजा, मोईन अली, रचिन रवींद्र, डॅरेल मिचेल यांच्याशिवाय शिवम दुबे, शार्दूल ठाकूर आणि दीपक चाहर यांची अष्टपैलू खेळी संघासाठी फायदेशीर ठरेल.  ऋतुराज गायकवाड, अंजिक्य रहाणे यांची फलंदाजी संघाची जमेची बाजू आहे. 


चेन्नईची कमकुवत बाजू कोणती ? CSK Weaknesses: 


चेन्नईकडे बॅकअप वेगवान गोलंदाज कमी आहेत, ही चेन्नईसाठी चिंतेची बाब आहे. दीपक चाहर, मथीशा पथिराना यासारखे दर्जेदार वेगवान गोलंदाज आहेत. पण त्यांचा बॅकअप कोण? असा प्रश्न उपस्थित राहतो. शार्दूल ठाकूर, तुषार देशपांडे हे पर्याय आहेत, पण त्यांच्या कामगिरीत सातत्य नाही. हे दोन्ही गोलंदाज महागडे ठरतात. मथीशा पथिराना आणि मुशफिकुर रहीम दुखापतग्रस्त आहेत, पहिल्या सामन्यासाठी ते उपलब्ध नाहीत. दीपक चाहर आणि शार्दूल ठाकूर धावा रोखण्यात सक्षम नाहीत. 



आरसीबीची ताकद काय ?  RCB Strengths: 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची ताकद नेहमीच फलंदाजी राहिली आहे. पण प्रत्येक हंगामाप्रमाणेच यंदाही आरसीबीकडे फक्त पाच चांगले फलंदाज आहेत. त्याशिवाय दिनेश कार्तिक हा चांगला फिनिशर आहे. तसेच वेगवान गोलंदाजांचा भरणा आहे. मोहम्मद सिराज याच्या जोडीला अल्जारी जोसेफ, आकाशदीप यांचा समावेश आहे.


कमकुवत बाजू कोणती ? RCB Weaknesses: 


आरसीबीची फलंदाजी खोलवर नाही.तळाला फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांमध्ये सातत्य नाही. दिनेश कार्तिक गेल्या हंगामात अपयशी ठरला होता. त्याशिवाय फिरकी गोलंदाजी ही सर्वात जास्त कमकुवत बाजू आहे. आरसीबीकडे एकही दर्जेदार फिरकी गोलंदाज नाही. कर्ण शर्माशिवाय एकही अनुभवी गोलंदाज नाही. ग्लेन मॅक्सवेल पार्ट टाईम गोलंदाज आहे. त्यामुळे फिरकी हीच आरसीबीची सर्वात कमकुवत बाजू आहे.